
लोकशाहीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी पत्रकारांचे स्वातंत्र्य जपणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांनी केले. मुंबई प्रेस क्लबने आयोजित केलेल्या ‘रेड इंक’ पुरस्कार वितरण सोहळय़ावेळी ते बोलत होते. न्यायाधीश आणि पत्रकार हे दोन व्यवसाय मुळात स्वतंत्र असले पाहिजेत. ते डगमगले तर लोकशाहीचे नुकसान होते.
ज्या पत्रकाराने आपले स्वातंत्र्य गमावले आहे ते आपले स्वातंत्र्य गमावलेल्या न्यायाधीशाइतकेच वाईट आहे. पत्रकारितेच्या व्यवसायात प्रामाणिकपणा हे खरेच सर्वोत्तम धोरण असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार टी. जे. एस. जॉर्ज यांना ‘जीवन गौरव रेड इंक’ पुरस्कार तर ‘रेड इंक जर्नालिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार दैनिक ‘भास्कर’चे राष्ट्रीय संपादक ओम गौर यांना प्रदान करण्यात आला.
























































