वारसावैभव – मेहकरचा दुर्लक्षित बालाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये बालाजीचे अत्यंत सुंदर मंदिर आहे. सध्याच्या घडीला पर्यटकांचा ओढा ताडोबा-लोणार सरोवराकडेच आहे, पण सरकारने निसर्ग पर्यटनाला धार्मिक पर्यटनाची जोड दिली तर मेहकरचे बालाजी देवस्थान देशाच्या पर्यटन नकाशावर येईल.

महाराष्ट्राला धार्मिक स्थळांची मोठी परंपरा आहे. राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात, पण अजूनही अनेक धार्मिक स्थळे पर्यटनाच्या नकाशावर आलेली नाहीत. बुलढाणा जिह्यातील मेहकर येथील शारंगधर बालाजीचे मंदिर हे त्यापैकीच एक आहे. बालाजीची अकरा फुटांची अत्यंत विलोभनीय मूर्ती भक्तांना नतमस्तक करते. बालाजीची जगातील सर्वात उंच मूर्ती असे या मूर्तीचे वर्णन केले जाते, पण अजूनही या मंदिराबाबत पर्यटक अनभिज्ञ आहेत. जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून अवघ्या एक-सवा तासाच्या अंतरावर मेहकर गावात हे अतिप्राचीन मंदिर आहे. आता तर समृद्धी महामार्ग या मेहकर गावातून जातो. राज्य सरकारने समृद्धी महामार्ग जातोय अशा सर्व जिह्यांतून टुरिझम सर्किट तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये या मंदिराचा समावेश केला तर पर्यटकांचे पाय बालाजीच्या दर्शनासाठी वळतील.

सध्या सर्व पर्यटकांचे पाय ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि जगविख्यात लोणार सरोवराकडे वळतात, पण पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. शेगावहून मेहकर 120 कि.मी. अंतरावर आहे. शेगावला दर्शन घेतल्यावर एक-सवा तासात मेहकरच्या बालाजीचे दर्शन आणि मंदिरात दुपारचे प्रसादाचे भोजन आणि मग लोणार दर्शन असा बेत करता येईल. मेहकरला थेट ट्रेन नाही, पण मुंबईहून अकोला, यवतमाळ, पुसद, नागपूर अशा खासगी लक्झरी बसेसना मेहकरचा स्टाँप आहे. पुण्यातून मेहकरसाठी वेगवेगळ्या दोनशे बसेसचा पर्याय आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग पूर्णपणे खुला झाल्यावर तर मेहकरसाठी अनेक पर्याय निर्माण होतील असा विश्वास श्री बालाजी संस्थानचे अध्यक्ष अॅड. संजय सदावर्ते व्यक्त करतात, पण त्यापूर्वी मंदिर व आसपासच्या परिसराच्या पायाभूत सुविधांचा विकास करावा लागेल. मुख्य रस्त्यापासून मंदिर गावात आतमध्ये आहे. बस थेट मंदिरापर्यंत जात नाही. त्यामुळे बसमार्ग गरजेचा आहे. मंदिरात जाण्यासाठी चढण चढून जावे लागते. त्यामुळे वयोवृद्ध भक्तांची दमछाक होण्याची शक्यता आहे, पण मंदिरातील विलोभनीय मूर्तीच्या दर्शनानंतर थकवा काही क्षणांतच निघून जातो. तिरुपतीच्या बालाजीच्या लाडूची आठवण येईल तशाच चवीसारखा लाडूचा प्रसाद भक्तांना देतात. त्यामुळे प्रसाद खाल्ल्यावर तर भक्त ताजेतवाने होतात.

मंदिर आणि मूर्तीचा इतिहास

सृष्टीसोबत उत्पन्न झालेल्या पैनगंगा (प्राणहिता) नदीच्या तीरावर हे शारंगधराचे मंदिर आहे. शारंगधराची ही मूर्ती इ.स. 1888मध्ये उत्खनन करून बाहेर काढली आहे. ही बालाजीची मूर्ती जगात सर्वात उंच असून तिची उंची 11 फूट व रुंदी चार फूट आणि जाडी दोन फूट आहे. ही एका प्रचंड गंडकी काळ्या रंगाच्या शिळेवर साकारली आहे. मूर्तीसोबत श्रीलक्ष्मी, भूदेवी विराजमान आहेत. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे याच ठिकाणी श्री बालाजीसोबत श्री लक्ष्मी विराजमान आहेत. म्हणून या ठिकाणी श्री लक्ष्मी-नारायणाचे एकत्रित दर्शन होते. मूर्तीच्या चरणांजवळ जयविजय व भूदेवी आहेत. ही मूर्ती चतुर्भुज असून हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवर मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, डाव्या बाजूला परशुराम, राम, बलराम, बौद्ध, कलकी असे दशावतार आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवर खंदस्थानी ब्रह्मा, विष्णू व महेश आहेत. आपल्या मनामध्ये जसे भाव येतील तसे भाव मूर्तीच्या मुखावर उमटतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या तीर्थक्षेत्राचा उल्लेख मत्स्यपुराणात स्पष्टपणे आहे. गौतमी महात्म्यातही शारंगधराचे वर्णन आहे.

समृद्धीवर बालाजीची प्रतिमा

नव्याने झालेला समृद्धी महामार्ग मेहकर शहरातून जातो. मेहकर येथे महामार्गावर इंटरचेंज आहे. अनेक पर्यटक मेहकर बालाजीच्या या स्थानाबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावर मेहकर इंटरचेंज (रिंग रोड) व टोल प्लाझा येथे श्री शारंगधर बालाजीची प्रतिमा व मंदिराचा एक बोर्ड (गँट्री बोर्ड) लावावा अशी मेहकरवासीयांची मागणी आहे. त्यासाठी श्री बालाजी मंदिर संस्थानच्या वतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदनही दिले आहे. महामार्गावर या ठिकाणी श्री शारंगधर बालाजीचा फलक लावला तर पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास या निवेदनात व्यक्त केला आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंदखेडराजा आणि लोणार सरोवरासह विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आर्थिक तरतूद केली जात आहे. समृद्धी महामार्ग जातोय अशा सर्व जिह्यांतून टुरिझम सर्किट तयार केले जाईल आणि त्याचा फायदा या भागाला होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाषण करताना सांगितले होते. त्यामुळे लोणारसोबत हे मंदिर व मंदिर परिसराचाही विकास व्हावा अशी मेहकरवासीयांची इच्छा आहे.

[email protected]