लग्नानंतर नवरी, मध्यस्थ, नवरीची मावशीही फरार; अडीच लाखांना गंडा; शेवगाव पोलिसांत गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुला-मुलीच्या संख्येतील विषम प्रमाणामुळे अनेक मुलांच्या लग्नाचा प्रश्न बिकट बनला आहे. नेमक्या या अडचणीचा फायदा काहीजण उठवत असल्याच्या अलीकडे अनेक घटना घडत आहेत. काहींचा तर लग्नाची मुले शोधून त्या कुटुंबास गंडा घालण्याचा व्यवसाय बनला आहे. शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथील एका बापाला त्याच्या मुलासाठी सोयरिक दाखवून मुलीला आई-वडील नसल्याने तिचा सांभाळ करणाऱया तथाकथित मावशीला व मध्यस्थाला चक्क दोन लाख मोजावे लागले. नवरी मुलाच्या घरी आल्यावर घरातील रोख तीस हजार रुपये व 30 हजारांचे 12 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन नवरीने घरातून भल्या पहाटे पोबारा केल्याची घटना घडली.

संभाजी ब्राह्मणे (रा. पिचडगाव, ता. नेवासा), मीराबाई जाधव (रा. बायजाबाई जेऊर, ता. नगर), दीक्षा महादेव कदम व तिची बहीण (नाव, गाव नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पंडित रामभाऊ कोरडे (वय 55, रा. कोळगाव, ता. शेवगाव) यांनी तक्रार दिली आहे.

कोरडे यांच्या परिचयातील नेवासा तालुक्यातील पिचडगाव येथील संभाजी नानासाहेब ब्राह्मणे यांनी मुलगा नितीन याच्यासाठी नगर तालुक्यातील जेऊर येथील दीक्षा महादेव कदम या मुलीचे स्थळ सुचविले होते. 20 जानेवारीला दुपारी पंडित कोरडे हे मुलगा नितीनसह गौतम दिलीपराव खंडागळे, यशवंत लक्ष्मण बोरडे, अशोक दळवी असे बायजाबाई जेऊरला गेले. कोरडे यांच्या कुटुंबाने मुलगी पाहिल्यानंतर मुला-मुलीची पसंती झाली. त्यावर मुलीची मावशी मीराबाई जाधव हिने मुलीला ‘आई-वडील नाही, तिला लहानाचे मोठे केले आहे. आम्ही काही मोठे लग्न लावणार नाही. तुम्ही तिची माळ घालून लागलीच लग्न करून घेऊन जा’, असे सांगितल्याने सायंकाळीच लग्नाचा कार्यक्रम आटोपून मुलगी दीक्षा, तिची मावशी मीराबाई, तिच्या बहिणीसह सर्वजण कोळगावला आले.

दुसऱया दिवशी सकाळी ‘मीराबाईने दीक्षाला लहानाचे मोठे केले. त्या बदल्यात संगोपन खर्च म्हणून तुम्ही तिला दोन लाख रुपये द्या’, असे संभाजी ब्राह्मणे याने सांगितले. यावर मुलाच्या भविष्याचा विचार करून पंडित कोरडे यांनी मीराबाईला दोन लाख रुपये दिले. त्यानंतर 27 जानेवारीला पहाटे 4 च्या सुमारास दीक्षा गायब झाली. शोधाशोध करताना घरात ठेवलेले 30 हजार रूपये रोख व 30 हजारांचे 12 ग्रॅम सोन्याचे दागिने ती घेऊन गेल्याचे लक्षात आले.

त्यामुळे कोरडे यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किरण टेकाळे तपास करीत आहेत.