
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्याच दिवशी 11 फलंदाज बाद झाले. फिरकीसाठी अनुकूल असलेल्या जामठाच्या खेळपट्टीवर पाहुण्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर पुनरागमन करणाऱया रवींद्र जाडेजाची जादू चालली. जाडेजाने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ 47 धावांत गारद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 63.5 षटकांत केवळ 177 धावांत आटोपला. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानने उर्वरित 24 षटकांच्या खेळात पहिल्या डावात 1 बाद 77 धावसंख्येपर्यंत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा 56 धावांवर खेळत होता, तर ‘नाईट वॉचमन’ म्हणून आलेला रविचंद्रन अश्विन शून्यावर त्याला साथ देत होता. सध्या हिंदुस्थानी संघ 100 धावांनी पिछाडीवर आहे.
रोहित-राहुलची अर्धशतकी भागीदारी
रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी 22.5 षटकांत 76 धावांची सलामी दिली. पदार्पणवीर टॉड मर्फीने राहुलला स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद करीत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. राहुलने 71 चेंडूंत 20 धावांची संयमी खेळी करताना केवळ एक चौकार लगावला. पहिल्या दिवसातील एका षटकाचा खेळ शिल्लक असताना राहुल बाद झाला. रोहितने 79 चेंडूंत 7 चौकार व एका षटकारासह आपली नाबाद अर्धशतकी खेळी सजविली.
नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र मोहम्मद सिराजने लढतीतील दुसऱया षटकात अन् स्वतःच्या पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला (1 धाव) पायचित पकडून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. वास्तविक पंचांनी पायचितचे अपील फेटाळले होते. मग कर्णधार रोहित शर्माने यष्टिरक्षक के. एस. भरत व सिराज यांच्याशी चर्चा करून अखेरची 2 सेकंद बाकी असताना डीआरएसची मागणी केली. रिप्लेमध्ये ख्वाजा पायचित असल्याचे स्पष्ट झाल्याने पंचांनी त्याला बाद दिले.
स्मिथला मिळाली दोन जीवदान
केवळ 2 धावांवर सलामीची जोडी तंबूत परतल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव संकटात सापडला होता, मात्र मार्नस लाबुशेन (49) व स्टीव्ह स्मिथ (37) यांनी तिसऱया विकेटसाठी 82 धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला, मात्र स्मिथला दोन जीवदानं मिळाली. 12 व्या षटकात के. एस. भरतने त्याला यष्टिचित करण्याची संधी दवडली. अक्षर पटेलचा ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू त्याला पकडता आला नाही. त्यानंतर 16 व्या षटकांत स्मिथला दुसऱयांदा जीवदान मिळाले. अक्षर पटेलच्याच गोलंदाजीवर विराट कोहलीने स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला.
जाडेजा, अश्विनने घेतली पाहुण्यांची फिरकी
पहिले सत्र उभय संघांसाठी संमिश्र यशाचे ठरल्यानंतर दुसऱया सत्रापासून हिंदुस्थानच्या फिरकी गोलंदाजांची जादू सुरू झाली. रवींद्र जाडेजाने लाबुशेन व स्मिथसह मॅट रेनशॉ (0) ही मधली फळी कापून काढत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला भगदाड पाडले. ऑस्ट्रेलियाचा डाव 4 बाद 84 असा पुन्हा एकदा संकटात सापडल्यानंतर पीटर हॅण्डस्कोम्ब (31) व ऍलेक्स कॅरी (36) यांनी काही काळ हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार करीत पडणारा डोलारा सावरण्याचा प्रयत्न केला. अश्विनने ऍलेक्स कॅरीच्या यष्टय़ा वाकवून ही जोडी फोडली, तर हॅण्डस्कोम्ब हा नवव्या फलंदाजाच्या रूपाने बाद झाला. त्याला जाडेजाने पायचित पकडले. या दोन फिरकीपटूंनी शेपटाला गुंडाळून ऑस्ट्रेलियाचा डाव संपविला. हिंदुस्थानकडून रवींद्र जाडेजाने 5, तर रविचंद्रन अश्विनने 3 फलंदाज बाद केले. मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांना 1-1 विकेट मिळाली.
सूर्यकुमार, भरत यांचे पदार्पण
सूर्यकुमार यादव व यष्टिरक्षक के. एस. भरत यांनी आज कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. 32 वर्षीय सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी-20 व वन डे क्रिकेटमध्ये आधीच पदार्पण केलेले आहे. मात्र 29 वर्षीय भरत आतापर्यंत एकही टी-20 किंवा वन डे क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. रिषभ पंत रस्ते अपघातात जखमी झाल्याने भरतला थेट कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. भरतला चेतेश्वर पुजाराने, तर सूर्यकुमारला रवी शास्त्र्ााr यांनी पदार्पणाची कॅप दिली. यावेळी एक भावनिक क्षणही बघायला मिळाला.
































































