
>> वैश्विक, [email protected]
एका मित्राने मध्यंतरी अचानक विचारलं की, सूर्याचा काही भाग तुटलाय का?… म्हटलं, काय विचित्र प्रश्न विचारतोयस! सूर्याचा तुकडा? एकेकाळी सूर्यापासूनच ग्रहमाला निर्माण झालीय… पण त्याला आता अब्जावधी वर्षे झाली. आता सूर्यामध्ये अशी काही उलथापालथ झाली तर ग्रहमालाच धोक्यात येईल. या बोलण्यानंतर नेटवर पाहिलं तर सौर ज्वालांचे लोळ (सोलार फ्लेअर्स) अवकाशात टाकण्याचं प्रमाण सूर्याकडून वाढलंय असं लक्षात आलं. थोडक्यात, सध्या सूर्य अक्षरशः ‘आग’ ओकतोय. सूर्याच्या अंतर्भागात असलेल्या नैसर्गिक अणुभट्टीमध्ये हायड्रोजनचं रूपांतर हिलियमध्ये होण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. तिथलं तापमान 14 कोटी सेल्सिअस (किंवा केल्विन) एवढं प्रचंड आहे. सूर्य हा एक वायुगोल तारा आहे. तो तेजोनिधी आहे ते त्याच्या अफाट उष्णतेतून निर्माण होणाऱया प्रकाशामुळे, पण तो केवळ लोहगोल मात्र नाही. ताऱयात असतात तसे अनेक धातू सूर्याच्या रचनेत सामावलेले आहेत. तर हा तप्त वायुगोल आता अधिक संतप्त झालाय. ‘सन’ म्हणजे सूर्याचा हा ‘सन्-ताप’ आपल्याला मात्र भरपूर तापदायक ठरू शकतो.
संपूर्ण सूर्यमालेत सौर ज्वालांचा ‘त्रास होऊ शकेल असा आपला एकमेव ग्रह पृथ्वी! बाकीच्या ग्रहांवर आगींचे लोळ आदळले तरी तिथे ना वनस्पती, प्राणी ना माणसासारखा बुद्धिमान सजीव. त्यामुळे आपल्यालाच या संभाव्य आगीनवर्षावाचा विचार करायला पाहिजे. अर्थात सौर-चक्र किंवा सोलार-सायकलमध्ये हे अनादीकाळापासून घडतंय. यापूर्वीही पृथ्वीला त्याचा उपसर्ग कित्येक वेळा पोचला असेलच, परंतु माणूस प्रगत झाल्यावर या गोष्टीची जाणीव गेल्या काही हजार वर्षांत झाली. इतिहास काळात सौर ज्वालांच्या उष्णतेने कुठे भूकंप, सुनामी, जंगलातले अग्निप्रलय असं घडलंच असणार, परंतु त्यावेळी त्याचा विचार होण्यापेक्षा धास्तीच जास्त वाटणं साहजिक होतं.
आधुनिक खगोलशास्त्र्ााचं संशोधन आणि प्रगती यामुळे आपल्याला अवघी सूर्यमाला जशी समजली तसंच पृथ्वीसकट सर्व ग्रहांचं स्वरूप आणि सूर्याचं अंतरंगही समजलंय. अकरा किंवा एकशे एकवीस वर्षांच्या सौर चक्राच्या काळात सूर्याच्या पृष्ठभागावरील उष्णता आगीचे मोठे लोळ होऊन बाहेर पडते. त्यातही सूर्याच्या प्रभामंडळातून (करोना) या ज्वाला वेगाने निघतात आणि सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने पुन्हा सूर्याकडेच खेचल्या जातात. काही ज्वालांचा आकार आणि वेग इतका असतो की, सूर्यपृष्ठापासून कित्येक हजार किलोमीटर दूरवर त्या पसरतात. मग सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने त्यांची एक कमानच तयार झाल्यासारखी दिसते. त्याला ‘सौर किरीट’ म्हणतात.
सौर ज्वालांचा ‘मॅक्झिमा’ किंवा अधिकाधिक आग ओकण्याचा काळ सध्या सुरू असून त्याचे काही गंभीर परिणाम आपल्यावर होऊ शकतात. म्हणूनच या सौर वादळांचा सामना करण्याची तयारी केली पाहिजे.
1859 मध्ये असंच एक प्रचंड सौर वादळ पृथ्वीच्या दिशेने झेपावलं. त्याने पृथ्वीच्या मॅग्नॅटोस्फिअरला (चुंबकीय क्षेत्राला) धडक दिली. त्यावेळी विजेच्या उपकरणाचा शोध लागायचा होता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणं असं घडलं नाही किंवा रेडिओसुद्धा नसल्याने काहीच परिणाम लोकांना जाणवला नाही, परंतु तेव्हाही तारायंत्रे होती. टेलिग्राफच्या या जगद्व्यापी जाळय़ावर या सौर ज्वालांच्या प्रारणांचा विपरीत परिणाम झाला. काही ठिकाणी ही यंत्रणा जळून गेली. त्यानंतर पुन्हा काही वेळा सौर ज्वालांचा उद्रेक झाला तेव्हा रेडिओ, वीज पुरवठा यंत्रणा बंद पडली.
आताच्या युगात तर सर्व काही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. अवकाशात फिरणारे उपग्रह, स्पेस स्टेशन, पृथ्वीवरची सारी संपर्क यंत्रणा, मोबाईल फोन, कॉम्प्युटर्स, टीव्ही, रेडिओ अशा अनेक गोष्टींवर या सौर ज्वालांच्या प्रारणांचा ‘हल्ला’ झाला तर पृथ्वीवर हलकल्लोळ उडेल. सौरज्वालांचा प्रकोप होण्याची चाहूल पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला लागली आहे. कुठे कुठे (तुर्कस्तानसारखे) भूकंप उत्पात घडत आहेत. ते मात्र यामुळे नाही. पृथ्वीवरची उष्णता अचानक वाढली तर जंगल आणि त्यातील वन्य जीव तसंच माणसालाही त्याचा धोका आहे. सौर ज्वालांचा कहर पृथ्वीवरची अत्याधुनिक संपर्क यंत्रणा मात्र नक्कीच वेठीला धरू शकतो. … आपण पृथ्वीवर राहून काय काय प्लॅन करत असतो! व्यक्तिगत नियोजनापासून आंतरराष्ट्रीय नियोजनापर्यंत चर्चा सुरू असतात आणि तिकडे सूर्याचा निर्हेतुक प्रकोप आपल्या अनेक भौतिक सुखस्वप्नांना सुरुंग लावू शकतो. जगात एकूणच वैज्ञानिक वापर वाढला असला तरी त्याचा विचार मर्यादितच आहे. त्यामुळे सौर ज्वालांच्या प्रकोपाचा फार विचार कुणी करणार नाही, पण ते ठाऊक असावं. कदाचित भाकिताप्रमाणे मोठे उत्पात घडणारही नाहीत. तसं झालं तर उत्तमच, पण शास्त्र्ाज्ञ तयारीत असतातच.





























































