दीपशिखा – द्रौपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयश्री संगीतराव

महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा म्हणजे द्रौपदी. जिचे आयुष्य सुरुवातीपासूनच सुखदुःखांच्या वेगवेगळय़ा वळणांनी गुंतलेले दिसते. अगदी मनापासून आवडलेल्या अर्जुनाशी विवाह केल्यानंतर तो केवळ आणि केवळ आपलाच पती असावा हेही सुख तिच्या वाटय़ाला आलं नाही. त्याच्यासाठी तिने कर्णाचा अपमान केला, दुर्योधनाचा अपमान केला. पुढे त्याचे परिणाम तिला भोगावेही लागले. कधीतरी ही सल तिच्या मनात बोचली असेल का? अनेक अपमानास्पद प्रसंगांतून तिला जावं लागलं. अनेक दुःखं पचवावी लागली. त्यातूनच तिच्या वागण्याचा उगम तर झाला असेल का? काही निर्णय घेण्याची वेळ तिच्यावर आली नसेल ना? महाभारत युद्धाचे मूळ कुठेतरी आपणही आहोत असे कधीतरी तिच्याही मनात आलं असेल का? कधीतरी स्वतःच्या मनात डोकावताना अपराधी भावना तिला जाणवली असेल का? द्रौपदीच्या भावविश्वाचा आणि तिच्या व्यथांचा घेतलेला वेध…

पांचालच्या द्रुपद राजाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञविधीतून जन्मलेली मी द्रौपदी… आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक नवं नाव मिळत गेलं, तशी ओळख बनत गेली आणि त्याभोवती आयुष्यही फरपटत गेलं. पिताश्रींनी त्यांचा बालपणीचा मित्र द्रोणाचार्यांच्या केलेल्या अपमानाचा बदला म्हणून पांडवांकडून बाबांना संधी बनवलं. त्यांचं अर्ध राज्य काबीज केलं. नंतर परतही केलं, पण तो अपमान बाबा कसे विसरणार? त्याचा बदला घेण्यासाठी शूर पुत्र व्हावा या अभिलाषेने त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्याचाच प्रसाद म्हणून मी आणि माझा बंधू धृष्टद्युम्नचा जन्म झाला. द्रुपदाची कन्या म्हणून ‘द्रौपदी’ हे नाव लागलं. यज्ञवेदीतून जन्माला आली म्हणून ‘याज्ञसेनी’ आणि श्यामवर्ण म्हणून ‘श्यामा’ ठरली. तारुण्याच्या उंबरठय़ावर पाऊल ठेवताच माझ्या विवाहाचे वारे वाहू लागले. पांडवपुत्र अर्जुनाची कीर्ती कानावर येत होती. मी मनाने केव्हा त्याची झाले हे माझे मलाच कळले नाही. स्वयंवरासाठी बाबांनी योजलेला ‘पण’ तसा कठीणच होता. श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुनच हे करू शकेल या कल्पनेनेच बहुधा त्यांनी हा ‘पण’ योजला असेल कदाचित. आपली लेक अशाच क्षत्रियाला द्यावी असं तर त्यांना वाटलं असेल? लाक्षागृहात पांडवांचा जळून अंत झाला असं साऱयांना वाटत असताना त्यांना इतका विश्वास का वाटावा? काहीतरी विधिलिखित नक्कीच असणार. ब्राह्मण वेशातल्या अर्जुनाला बघून माझं मन तर जणू मोरपिसासारखे भिरभिरत होतं. विवाहानंतर माता पुंतीचा आशीर्वाद घ्यायला खूप आनंदात होते मी, पण थोडय़ाच वेळात आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळेल याचा जराही थांगपत्ता नव्हता. ‘‘आणलेली भिक्षा पाचही बंधू वाटून घ्या’’ ही मातेची आज्ञा शिरसावंद्य मानून मी पाचही पांडवांची पत्नी बनले आणि ‘पांचाली’ या नावाला ओळख देऊन गेले. कृष्णसख्याची सखी म्हणून ‘कृष्णा’ बनले. या साऱया नावाबरोबरच अनेक नात्यांची नावं मला बिलगली. कोणत्या नात्याने मला पूर्ण आनंद दिला, माझं मलाच कधी गवसलं नाही.

पती म्हणून अर्जुनावर माझं सगळय़ात जास्त प्रेम होतं, पण त्याचा मात्र सुभद्रेवरच जास्त जीव होता. प्रत्येकाला हक्काची आणखी भार्या होती. पण माझं म्हणावं असं आयुष्यात माझं कोणी होतं का? घडलेल्या काही घटनांवरून एक गोष्ट मात्र पक्की कळली की, माझ्यावर भीमाचं सगळय़ात जास्त प्रेम होतं. धर्मराजाने मला डावावर लावलं तेव्हा भीमाचा क्रोध अनावर झाला. माझी भरसभेत विटंबना होताना त्याने केलेली प्रतिज्ञा आणि अज्ञातवासात विराट राजाच्या राज्यात सैरंधीच्या रूपात असताना राणी सुदेशनाचा बंधू कीचकाने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करताच दुसऱया दिवशी प्रातःकाळी त्याचं कलेवर अंगणात पडलं. कोणी केलं हे? कोणालाच कळत नव्हतं, पण मला पक्पं ठाऊक होतं, हे माझ्या भीमानेच केलं. याच अज्ञातवासात मला बिरूद मिळालं ‘सैरंध्री’ नावाचं. माझ्यावर येणाऱया प्रत्येक प्रसंगातून माझा आत्मविश्वास, धीरगंभीरता अधिकच वाढू लागली. भरसभेत दुःशासनाने माझ्या वस्त्र्ााला हात घालताच सभागृहात खाली मान घालून बसलेले पितामह, ज्येष्ठ तात आणि इतर गुरुवर्य मान्यवरांना सवाल करताना माझ्यात जणू विद्युल्लता संचारली होती. सारेच निरुत्तर होते. त्यांची अगतिकता चेहऱयावर दिसत होती. माझा क्रोध वाढून आपल्या पुत्रांसाठी माझ्याकडून काही शापवाणी निघू नये म्हणून ज्येष्ठ तात माझी समजूत घालू लागले. त्यांनी मला तीन वर मागण्यास सांगितले. एका वराने मी माझ्या पाचही पतींना दासमुक्त करावं व दुसऱया वराने त्यांचं राज्य त्यांना मिळावं हा वर मी मागितला. त्यांनी मला माझ्यासाठी आणखी एक वर मागायला सांगितला, पण क्षत्रिय पत्नीला एकावेळी फक्त दोनच वर मागण्याचा अधिकार आहे असं सांगून मी माझ्यातला क्षत्रिय धर्म जपला. त्यावेळी काwरवांच्या नाशाचा एखादा वर मागू शकले असते, पण अशाही स्थितीत माझा संयम, माझी बुद्धी शाबूत होती. मला हे कसं साध्य झालं? नक्कीच माझा सखा कृष्णावरच्या असलेल्या माझ्या विश्वासातून असेल. समोरच्याला शिक्षा ही मिळणारच त्याच्या कर्माने हेच त्या वेळी माझ्या मनाला पटलं असेल. माझ्या या कृतीतून कृष्णाची सखी म्हणून ‘कृष्णा’ हे नाव सार्थ ठरलं.

आयुष्यात मागे डोकावताना माझ्याही काही चुका झालेल्या मला कळतात. काही कळत, काही नकळत. काही आपल्यावर झालेल्या अन्यायातून कर्णाला सूतपुत्र म्हणून स्वयंवराच्या वेळी नाकारणं किंवा अंधाचे पुत्र अंध, असे माझे उद्गार, वैरत्व, वितुष्ट आणि शत्रुत्वाला आणखीच खतपाणी घालून गेले. माझ्या जीवनाची फरपट चालूच होती. महाभारत रणसंग्राम सुरू झाला. माझे पाचही पुत्र एका कुटीत निद्रिस्त असताना अश्वत्थाम्याने पांडव समजून जे अस्त्र्ा सोडलं त्यात त्यांचा बळी गेला. सारं आयुष्य जणू भकास बनलं होतं. अश्वत्थाम्याला मी शापित करू शकले असते, पण त्या वेळी शांत राहिले. कुठून आली असेल एवढी शक्ती? इतकी सहनशीलता? सख्या कृष्णा, तुझीच ही लीला. कुरुकुलाचा दुर्दैवविलास ठरलेलं महाभारत युद्ध एकोणीस दिवस चाललं. सारे रथीमहारथी, गुरुवर्य, आप्तेष्ट, पांडवांचे पाच वंशज…सारे सारे स्वकीयांकडूनच मारले गेले. सायंकाळचा सूर्य आक्रोशात बुडाला. काय मिळालं? हक्क मिळाला, राज्य मिळालं, पण समाधान? ते तर चितेवर जळलेल्या प्रत्येक कलेवराबरोबर जळून खाक झालं होतं. आयुष्यात मागे वळून बघितलं तर वाटतं, त्याला आपणही तितकेच जबाबदार आहोत नाही का? की हे असंच घडावं हे मी विधिलिखित लिहून आणलं होतं. कुणाचा जन्म कशासाठी होतो हे नियतीच ठरवते. तसं बघितलं तर माझा जन्म हा प्रश्न मनात मनात राहतो. माझा जन्मही पुत्रकामेष्टी यज्ञातून झाला असला तरी त्यामागे बदला घेण्यासाठी बलाढय़ पुत्र व्हावा हाच हेतू होता बाबांचा. म्हणजे जन्माबरोबरच ही बदल्याची भावना माझ्या रक्तात भिनली असेल का? म्हणूनच जीवनाच्या सारीपाटावर दान टाकल्यासारखी जगले आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर? शेवटी पतीसवे स्वर्गात न जाता अर्ध्या वाटेवरच कोसळले. धगधगतं जीवन शांत झालं. कुठलीही आशाअपेक्षा न ठेवता नीरव शांततेसाठी अनंत ब्रह्मांडाच्या कुशीत ही याज्ञसेनी यज्ञातल्या मधासारखी आनंदाने विसावली, चिरविश्रांती घेण्यासाठी. म्हणूनच असं वाटतं की,

‘विधिलिखित मम भाळीचे
रणधुमाळीस का
कारण ठरले?
कुठेतरी मीही चुकले,
मजला माझ्या
अंती कळले’

– [email protected]