
शब्दांकन : निनाद पाटील
आज मी साईंची भूमिका करतोय. करतोय म्हणण्यापेक्षा शब्दशः जगतोय, पण या भूमिकेने मला जे दान दिले ते नेमके शब्दांत मांडता येत नाही… सांगताहेत, अभिनेता तुषार दळवी.
दशमी क्रिएशनमधून मला पह्न आला. साईबाबांच्या भूमिकेसाठी विचारणा करण्याबाबत… क्षण दोन क्षण मला काही सुचेना. एक तर माझ्या इतक्या वर्षांच्या अभिनय कारकीर्दीमध्ये अशा पद्धतीची भूमिका मी यापूर्वी कधीच केली नव्हती. माझ्या ‘हॅम्लेट’ नाटकाचे प्रयोग चालू आहेत. शेडय़ूल आधीच ठरलेले आहे. आधीच्या काही कामांविषयीच्या गोष्टीसुद्धा निस्तरायच्या आहेत. मग काय करू, कसे करू? सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतकी महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि केवळ भूमिकाच नाही ती कमिटमेंट आहे, आपल्याला झेपायला हवी. मला हे शिवधनुष्य जमेल ना पेलायला? एक ना अनेक असे विचार मनात गर्दी करत राहिले. नंतर माझ्या नेहमीच्या कामात, शूटिंगमध्ये, नाटकाचे प्रयोग, रेकार्ंडग, आधीच्या काही कमिटमेंट यात मी व्यस्त झालो. मनातून या भूमिकेचा विचार निघून गेला किंवा मी विसरलो असे नाही झाले.
बॅक ऑफ द माइंड म्हणतात ना तसे आतल्या आत सतत आठवत राहायचे. दोन महिन्यांनी पुन्हा मला पह्न आला प्रॉडक्शनकडून विचारण्यासाठी आणि मी तिथे ऑडिशनसाठी गेलो. गेल्या दोन महिन्यांत अजून सिलेक्शन झालं कसं नाही इतर कुणाचं, असा विचार मनात करता करताच मी गेटअपमध्ये तयार झालो. कॉस्च्यूम, मेकअप, हेअर सारं झालं आणि मी आरशात पाहिलं आणि पाहतच राहिलो. माझा माझ्यावरतीच विश्वास बसत नव्हता. माझ्याच नजरेत आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाची नजर मिसळली आणि एक अनामिक सकारात्मक ऊर्जा माझ्यात रुजवून गेला तो क्षण. इतर सोपस्कार पार पडले आणि ती भूमिका मला मिळाली. भूमिकेला स्वतःकडून शंभर टक्के न्याय द्यायचा या विचाराने मी झपाटून गेलो. दिवस-रात्र त्याच भूमिकेचा विचार करायला लागलो. साईबाबांविषयी जी काही माहिती मिळेल ती फार बारकाईने, अभ्यासपूर्वक आणि श्रद्धेने वाचायला लागलो. भूमिकेचा अभ्यास म्हणून मी साईचरित्र वाचायला लागलो. एक-एक अध्याय वाचून संपत होता, तसा माझा मी मला नव्याने सापडत होतो. अंधेरीवरून नायगावला सेटवरती दररोज प्रवास करून कितीही थकून भागून गेलो तरी त्या सेटवरती अशी एक अनामिक ऊर्जा आहे, जी मला क्षणात टवटवीत करून टाकते. तिथे प्रतिशिर्डीच उभी केली आहे. माझे बहुसंख्य सीन आऊटडोर असतात. तो मेकअप, दाढी लावायला वापरलेला गोंद साऱया साऱयांचा किंचितही त्रास मला होत नाही. ज्याक्षणी त्या भूमिकेत मी शिरतो तेव्हा मला आजूबाजूच्या जगाचे भान राहत नाही, इतका मी त्या भूमिकेशी एकरूप झालेला असतो. नेमकी काय किमया असेल बरं ही ते आजतागायत न सुटलेले कोड आहे आणि या भूमिकेचे एका वेगळय़ा अर्थाने असलेले यशसुद्धा!
साईंच्या भूमिकेने श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी शिकवल्या. एखादी गोष्ट घडणार असेल तर ती घडतेच, आपण त्याच्या फार मागे लागता कामा नये. विश्वास ठेवावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबुरी ठेवावी. त्यामुळे मीही खूप शांत आणि संयमी झालोय आणि या साऱया सकारात्मक बदलाचे श्रेय मी अर्थातच साईबाबांच्या भूमिकेला देतो.
दुसऱ्यांना मदत करा
कुणीही अडीअडचणीत असेल तर स्वतःला शक्य होईल तितकी मदत साईबाबा नेहमीच दुसऱ्यांना करत. आज मलाही सांगायला अभिमान वाटतो की, ही भूमिका करण्याच्या आधीसुद्धा मी थोडीफार मदत अडलेल्या व्यक्तींना करायचो, पण या भूमिकेमुळे माझा दृष्टिकोन बदलला. अधिक मायेने, ममतेने समोरच्या व्यक्तींच्या अडचणींशी, त्यांच्या प्रश्नांशी जोडला जाऊ लागलो. आपल्याने होईल तसं फुल ना फुलाची पाकळी तरी दुसऱयाला देता येईल का? आपल्यातली चतकोर भाकर दुसऱयाला देऊन, त्याची त्या क्षणाची भूक भागवता येईल का? हा विचार आणि कृती दोन्ही सुखावणारा आहे आणि ते सुख मी पुरेपूर अनुभवतोय.




























































