उन्हाच्या तडाख्यामुळे शाळा बंद, मे महिन्यापासूनची उन्हाळी सुट्टी एप्रिलपासूनच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात उन्हाचा कहर पाहता मे महिन्यापासून सुरू होणारी उन्हाळी सुट्टी एप्रिलच्या याच आठवड्यापासून देण्यात येईल. शाळांकडून याविषयी अहवाल मागविण्यात आले असून शक्य असल्यास आजपासून उन्हाळी सुट्टी दिली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना गुरुवारी सांगितले.

गेल्या काही दिवसांपूर्वी खारघर येथे झालेल्या उष्माघाताच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर शालेय शिक्षणमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत उन्हाळी सुट्टी याच महिन्यापासून सुरू केली जाईल, असे सांगितले. शाळांची परीक्षा आणि निकालाची कामे पूर्ण झाली असतील तर शाळांना आजपासूनच उन्हाळी सुट्टी दिली जाईल, असेही केसरकर म्हणाले.

शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेनंतर पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे. आज गुरुवारी प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथून प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांची उन्हाळी सुट्टी आणि शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या नियोजनाबाबत परिपत्रक जारी करण्यात आले. यात 2 मे ते 14 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी देऊन 15 जूनपासून शाळा सुरू करण्यात येतील तसेच जूनमधील विदर्भाचे तापमान विचारात घेता 30 जूनपासून तेथील शाळा सुरू होतील, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी माध्यमिक शिक्षण संचालकांकडून विदर्भ वगळाता राज्यातील शाळा 12 जून रोजी, तर विदर्भातील शाळा 26 जून रोजी सुरू करण्याविषयीचे परिपत्रक काढण्यात आले होते.

केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात घ्या
राज्यातील पालक संघटनांनी वाढत्या तापमानामुळे केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. खारघरमध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना व त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात सीबीएसई शाळा 10 मेपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर उन्हाळय़ाची सुट्टी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. मात्र शाळा 10 मेपर्यंत सुरू ठेवताना त्या सकाळच्या सत्रात भरवल्या जाव्यात अशी पालकांची मागणी आहे.