
खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा म्होरक्या अमृतपाल याला पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याप्रकरणी तब्बल 35 दिवसांच्या पाठलागानंतर आज सकाळी पंजाबच्या मोगा जिह्यातील रोडे गावात अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटक केल्यानंतर कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तातडीने त्याची रवानगी आसामच्या दिब्रुगड तुरुंगात करण्यात आली आहे. आधी अटक केलेल्या त्याच्या नऊ साथीदारांनाही दिब्रुगड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती विशेष पोलीस महासंचालक आर. एन. डोके यांनी दिली.
अमृतपाल सिंग हा मोगा जिह्यातील रोडे गावातील एका गुरुद्वारात लपला असल्याची ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. रोडे गावाला आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पोलिसांनी वेढा घातला आणि अमृतपालला अटक केली. पोलिसांनी गुप्तचर विभागाच्या मदतीने ही कारवाई अत्यंत चोखपणे पार पाडली. दरम्यान, लोकांनी शांतता राखावी, अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शरणागती नाही, अटकच
खलिस्तानची मागणी करणाऱया जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा समर्थक असलेल्या अमृतपाल सिंग याने देशाविरोधात चिथावणीखोर भाषणे करून तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केला. अमृतपाल सिंग याच्यावर अपहरण, खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नाचे अनेक गुन्हे दाखल असून तो तरुणांना हिंदुस्थानविरोधात लढण्यासाठी शस्त्रs चालवण्याचे प्रशिक्षण देत होता. अमृतपाल शरण आला नाही तर त्याला अटकच केली आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
अमृतपाल रोडे गावात का लपला?
अमृतपाल सिंग हा सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’मध्ये मारल्या गेलेल्या खलिस्तानी दहशतवादी भिंद्रनवाले याचा कट्टर समर्थक आहे. रोडे हे भिंद्रनवाले याचे गाव आहे. त्यामुळे अटक झाल्यानंतर प्रकाशझोतात येण्यासाठी त्याने ही खेळी खेळली. सुवर्ण मंदिरात शरणागती पत्करण्याची त्याची योजना होती, मात्र पोलिसांनी त्याची ही खेळी उधळून लावली होती. त्यानंतर त्याने रोडे गावाची निवड केली.
























































