नगर शहरात पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच असून, बुधवारी (दि. 3) उड्डाणपुलाखाली जीपीओ चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले पथारीवाले, पाण्याचे माठ व बॅट विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. विक्रेत्यांनी रस्त्याच्या बाजूने ताडपत्री व इतर साहित्य वापरून उभारलेले शेड मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटविले आहेत.

शहरात मागील काही दिवसांपासून महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून, या मोहिमेत सातत्य ठेवून दररोज कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातीचे काही दिवस बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविण्यात आली. आता महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरात नव्यानेच उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारी अतिक्रमणे हटविण्यात येत असून, बुधवारी (दि. 3) जीपीओ चौकात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रस्त्याच्या दोन्ही बाजूने ताडपत्रीचे शेड उभारून पथारी लावून माठ आणि बॅट विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

दरम्यान, सावेडी उपनगरातही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे. प्रभाग समितीकडे आलेल्या तक्रारीनुसार अतिक्रमण विरोधी पथकाने पारिजात चौकातील ज्यूस सेंटरची हातगाडी, वडेवाले आणि मसाला ताक विक्रेत्यांच्या गाडय़ा व टपऱया हटविल्या आहेत. या कारवाईत ज्यूस सेंटरची हातगाडी पथकाने जप्त केली आहे. अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे यांच्या आदेशानुसार प्रभाग अधिकारी संजय उमाप, क्षेत्रीय अधिकारी देवीदास बिज्जा यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.