
मंत्रालयात नोकरीच्या नावाखाली तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेल्या तरुणाची मंत्रालयात मुलाखत आणि जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीदेखील झाली होती. नोकरीच्या नावाखाली फसवणुकीबाबत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘सामना’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची दखल घेऊन तक्रारदार याने शिवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणूकप्रकरणी शिवडी पोलिसांनी चारजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे शिवडी येथे राहतात. त्याच्या वडिलांच्या मित्राने एकाची ओळख करून दिली होती. तो व्यक्ती मंत्रालयात नोकरी आणि आरेचे दूध स्टॉल देतो असे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदार याने त्याच्या कुटुंबातील पाचजणांना नोकरी हवी असल्याचे त्याना सांगितले. नोकरी हवी असल्यास पैसे द्यावे लागतील असे त्याना सांगण्यात आले. तक्रारदार याची एकाशी भेट करून दिली. ते मंत्रालयात काम करणार असल्याचे त्याना सांगण्यात आले. चौघांना मंत्रालयात नोकरी देऊ असे सांगितले गेले. नोकरीसाठी सुरुवातीला 50 हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर आणखी 1 लाख 45 हजार रुपये एकाला दिले.
नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर त्याची मंत्रालयात मुलाखत घेण्यात आली. विश्वास बसावा म्हणून नियुक्तीचे पत्रदेखील दिले गेले. मंत्रालयात शिपाई म्हणून काम करणारे एक जण त्याना मंत्रालयात सोडत होते. तसेच त्याची कोविड काळानंतर वैद्यकीय तपासणी करू असे सांगितले. वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली त्याच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेण्यात आले. तक्रारदार याने एकाला नोकरीबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने शिवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.



























































