
कोणताही परवाना नसतानाही मुडी या अॅपचा वापर करून सरकारच्या फसवणूकप्रकरणी आणखी एकाला क्राईम ब्रँच युनिट 11 ने अटक केली आहे. धिमंत गांधी असे त्याचे नाव आहे. त्याने मुडी अॅप हे आरोपींना वापरण्यास दिले होते. त्या अॅपच्या मोबदल्यात धिमंतला काही पैसे मिळत होते. धिमंतच्या अटकेने आरोपींची संख्या पाच झाली आहे.
कांदिवलीच्या महावीर नगर येथे एक जण स्टॉक एक्स्चेंजचा परवाना नसतानाही मुडी अॅपचा वापर करून डब्बा ट्रेडिंग करत असल्याची माहिती युनिट 11 ला मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या पथकातील अधिकाऱयांनी तेथे छापा टाकला. छापा टाकून जतीन मेहताला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पह्न, थ्रेडर राऊटर आणि पैसे जप्त केले. पोलिसांनी जतीनची चौकशी केली. त्याच्या चौकशीत आणखी तीन सबब्रोकरची माहिती मिळाली. त्या तिघांनादेखील पोलिसांनी अटक केली. तिघांच्या चौकशीनंतर पोलिसांना धिमंतची माहिती मिळाली. पोलिसांनी चारकोप परिसरातून धिमंतला ताब्यात घेऊन अटक केली. फसवणुकीसाठी लागणारे मुडी अॅप हे धिमंतने एका आरोपीला दिले होते. त्याच्या मोबदल्यात ते काही रक्कम हे धिमंतला देत असायचे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणारा जेरबंद
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देऊ असे सांगून फसवणूक करणाऱया एकाला चारकोप पोलिसांनी अटक केली. अक्षय आहुजा असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार या गृहिणी असून त्या चारकोप येथे राहतात. त्या वेबसीरिजमध्ये काम करतात. त्यांना शेअर ट्रेडिंग करणाऱया अक्षयची माहिती मिळाली. सुरुवातीला त्यांनी गुंतवणूक करण्यास नकार दिला. त्यानंतर अक्षयने महिलेला गुंतवलेल्या रकमेत 60 टक्के आणि मुद्दलसह जास्तीचे 60 टक्के रक्कम देऊ असे त्याने सांगितले. तसेच एक वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 75 टक्के रोज नफा देऊ असे सांगितले. एवढेच नव्हे तर तीन महिन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज नफा आणि नंतर मुद्दल देऊ असे तो सांगायचा.
त्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला 7 लाख रुपये गुंतवले. त्या पैशाबाबत करारदेखील केला. अक्षयने महिलेच्या पतीला बोलावून पुन्हा 13 लाख गुंतवण्यास सांगितले. अजून पैसे गुंतवल्यास डबल पैसे करून देतो असे तो सांगत होता. ठरल्यानुसार त्याने पैसे गुंतवले. गुंतवणुकीच्या परताव्याबाबत महिलेने विचारणा केली असता अक्षय टाळाटाळ करू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अक्षयविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.





























































