
>> अभय मिरजकर
दसऱ्याच्या दिवशी आपटय़ासोबत चांदी म्हणून जी पाने दिली जातात ती आहे शमीची. आध्यात्मिक आणि औषधी असणारा शमी आज दुर्मिळ होत आहे. बोलीभाषेत त्याला सौंदड अथवा समदड म्हणतात. लग्नात हळदीच्या मांडवाला शमीची फांदी हवीच असते. त्याचप्रमाणे घरातही शमी असणे शुभ समजले जाते. दुर्मिळ होत चाललेल्या या वृक्षाचे जतन करणे आवश्यक आहे.
देशात सर्वत्र आढळणारा हा वृक्ष आहे. शमीची पाने गणपतीला वाहिली जातात. तसेच भगवान शंकराला ही वाहिली जातात. ज्याप्रमाणे दुर्वांचे महत्त्व गणपती पूजेसाठी आहे अगदी तसेच शमीच्या पानांचेही आहे. शमीची लाकडे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करता येतो म्हणून यज्ञकर्मात शमीच्या समिधा वापरल्या जातात. अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रs कापडामध्ये गुंडाळून शमी वृक्षावरील एका ढोलीत ठेवली होती. दसऱ्याच्या दिवशी लोक सीमोल्लंघनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाचे दर्शन घेतात. शस्त्रांची पूजा करताना शस्त्रांवर शमीपत्रे वाहतात. आपटय़ाची पाने सोने म्हणून एकमेकांना देतात. त्यासोबत चांदी म्हणून शमीची पाने दिली जातात. देशात राजस्थान आणि तेलंगणा राज्याचा राजवृक्ष म्हणून शमीची ओळख आहे.
शमीचा उपयोग विविध औषधांमध्ये केला जातो. अतिसार, मूळव्याध आणि त्वचेच्या विकारावरील औषधे यापासून बनविली जातात. या झाडाचा डिंकदेखील औषधी गुणांनी युक्त आहे. अंगाचा दाह कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. शरीरावर जखमेचे व्रण राहिल्यास शमीच्या झाडाची साल उगाळून लेप लावतात. शरीरातील उष्णता घालविण्यासाठी शमीच्या फुलांचा किंवा पाल्याचा रस जिरे व खडीसाखर घालून वापरतात. तसेच उन्हाळी लागल्यावरही याचाच वापर केला जातो. झाडाची साल कुष्ठरोग, दमा, स्नायूंच्या गाठी बरे करण्यासाठी आणि मेंदूच्या कमकुवतपणासाठीही वापरली जाते. अतिसारात शमीच्या सालीचा वापर केला जातो.
शमीच्या शेंगांची भाजी
लातूर जिह्यात शमीच्या कोवळ्या शेंगांची भाजी करतात. ही भाजी चवीला मस्त आहेच, पण आरोग्यासाठीसुध्दा उपयुक्त आहे. शमीच्या कोवळ्या शेंगा, कांदा (चिरलेला) , हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कडीपत्ता, लसूण, हळद, मीठ, लाल मिरची, धणे पावडर, जिरे, मोहरी, तेल, दही भाजीसाठी वापरतात. शमीच्या शेंगांचे तुकडे करून ते उकडून व पिळून घ्यावे. भांडय़ात फोडणीसाठी तेलात कडीपत्ता, जिरे, मोहरी, चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, वाटलेला लसूण घालून परतावे. थोडय़ा वेळाने त्यात लाल मिरची, धणे पावडर, मीठ टाकून परतून घ्यावे. नंतर त्यात थोडे दही आणि थोडे पाणी टाकून हे मिश्रण शिजवून घ्यावे. हे मिश्रण शिजले की, त्यात उकडून घेतलेल्या शमीच्या शेंगा टाकून पाच मिनिटे शिजू द्यावे.
शमीच्या झाडावर वाळलेल्या शेंगा या बिस्किटाप्रमाणे गोड असतात. शमी वृक्ष प्रतिकूल हवामानातही वाढतो. हा वृक्ष काटेरी आहे. पानांच्या विरुद्ध बाजूला अणकुचीदार, बाकदार काटे असतात. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. फुले पिवळी, लहान आणि एका दांडय़ावर असतात. मार्च ते मेपर्यंत फुले येऊन गेल्यावर जून ते ऑगस्टच्या दरम्यान शेंगा पिकतात. शमीच्या लाकडाचा उपयोग इंधनासाठी करतात. लाकूड कणखर असते, पण त्याला कीड लवकर लागते. शनिवारी शमीचे झाड लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार हे रोप नेहमी घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लावावे. त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा येते, ज्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो असे सांगितले जाते.


























































