
अॅशेस कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू असतानाच इंग्लंडला धक्का बसला. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. उद्या किंवा सोमवारी माझा क्रिकेटमधील शेवटचा दिवस असेल, असे म्हणत स्टुअर्ट ब्रॉडने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला.
मी गेल्या काही आठवड्यांपासून याबाबत विचा करत होतो आणि शुक्रवारी अंतिम निर्णय घेतला. याबाबत कर्णधार बेन स्टोक्स याच्याशीही चर्चा केली, असे स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला. उद्या किंवा सोमवारी माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा दिवस असेल. हा प्रवास संस्मरणीय होता. या ऐतिहासिक मालिकेचा भाग असल्याचा मला अभिमान असून मला नेहमीच कारकिर्दीचा शेवट शिखरावर असताना करायचा होता, असेही तो म्हणाला.
🚨 BREAKING: Veteran England pacer set to retire at the end of the ongoing #Ashes series! https://t.co/7E4TfzOfPC
— ICC (@ICC) July 29, 2023
2007 ला झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानच्या युवराज सिंह याने ब्रॉडला सलग सहा षटकार ठोकले होते. युवराज सिंह याने त्याची बेदम धुलाई केली होती. तेव्हा कोणालाही वाटले नसेल की हाच गोलंदाज भविष्यामध्ये दिग्गज गोलंदाजांच्या यादीत दिसेल. पण आज कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या, तर 600 बळींचा टप्पा ओलांडणारा फक्त दुसरा गोलंदाज आहे.
कारकिर्दीचा शेवटचा सामना खेळणाऱ्या ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 602 बळी घेतले आहेत. ओव्हलच्या मैदानावर सुरू असलेल्या लढतीत त्याला बळींची संख्या वाढवण्याची संधी मिळणार आहे. कसोटीसह 121 वन डे लढतीत त्याने 178, तर 56 टी-20 लढतीत 65 बळी घेतले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये फक्त दोन वेगवान गोलंदाजांना 600 बळींचा टप्पा गाठता आला आहे. यात स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर असून 690 बळींसह जेम्स अँडरसन पहिल्या स्थानावर आहे. गोलंदाजीसह ब्रॉडने फलंदाजीतही इंग्लंडसाठी योगदान दिले आहे. कसोटीत त्याच्या नावावर 3656 धावांची नोंद आहे. यात त्याच्या एका शतकाचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.































































