
- फिटनेस सिद्ध करण्यासाठी अय्यर–राहुलची थेट निवड
- एकही वन डे न खेळलेल्या तिलक वर्माला संधी
- युझवेंद्र चहल बाहेर, राखीव म्हणून संजू संघात
गेले वर्षभर अनफिट असलेली टीम इंडिया आशिया कपसाठी फिट झाली आहे. आगामी वर्ल्ड कपचा संभाव्य संघ म्हणून आशिया कपसाठी निवडलेल्या 17 खेळाडूंच्या संघात थेट फिटनेस सिद्ध करता यावी म्हणून के.एल. राहुल, श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली असून नुकतेच फिट झालेल्या जसप्रीत बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णा या वेगवान गोलंदाजांचीही वर्णी लागली आहे. मात्र आपल्या प्रभावी फिरकीनंतरही युझवेंद्र चहलला संघातून डावलण्यात आले आहे. तर यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
आज नवी दिल्लीत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने आशिया कपसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला, पण या संघात थेट के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यरच्या निवडीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. हे दोघेही गेले सहा-सात महिने दुखापतीमुळे संघाबाहेर होते. तसेच जसप्रीत बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान गोलंदाजही वन डे संघात पुनरागमन करत आहेत. त्यामुळे दुखापतीतून सावरलेले खेळाडू हिंदुस्थानला सावरण्यासाठी आशिया कपमध्ये उतरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
हिंदुस्थानी संघात यष्टिरक्षकांची फौज
हिंदुस्थानी संघात इशान किशन होताच, आता के.एल. राहुल हासुद्धा यष्टिरक्षक सलामीवीर आला आहे. त्यामुळे फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. म्हणजेच एका वेळी तीन यष्टिरक्षक आशिया कपला असतील.
तिलक वर्माला लॉटरी
विंडीज दौऱयातील शेवटच्या तीन टी-20 सामन्यात लक्षवेधी आणि झुंजार कामगिरी करणाऱया तिलक वर्माने निवड समितीवर अशी मोहिनी घातली की गेल्या दोन सामन्यांतील 0 आणि 1 धावेनंतरही निवड समितीने त्याच्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे एकही वन डे न खेळलेल्या तिलक वर्माला लॉटरी लागली आहे. हिंदुस्थानची मधली फळी कमकुवत असल्यामुळे तिलक ही संधी देण्याचे धाडस निवड समितीने केले आहे.
सूर्यकुमारला आणखी एक संधी
सूर्यकुमार टी-20 क्रिकेटमध्ये अव्वल असला तरी त्याला अद्याप वन डेमध्ये आपला जलवा दाखवता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शून्याच्या हॅटट्रिकचा निराशाजनक विक्रम केल्यानंतरही त्याला विंडीजविरुद्ध संधी मिळाली. तेथेही 19, 24, 35 अशा खेळ्या त्याच्या बॅटीतून निघाल्या. त्याच्या अपयशाची मालिका कायम असतानाही आशिया कपमध्येही पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र त्याच्या बॅटीतून मधल्या फळीला सावरणारी खेळी आली नाही तर हे त्याला महागात पडू शकते.
मधल्या फळीवर विशेष लक्ष
सलामीवीरांची फौज असल्यामुळे जोरदार कामगिरी करणाऱया यशस्वी जैसवालचे नाव मागे पडले आहे. मात्र मधल्या फळीला ताकद मिळावी म्हणून के.एल. राहुल, श्रेयस अय्यर या दोन्ही दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा हेसुद्धा चौथ्या क्रमांकाचे दावेदार आहेत. तसेच इशान किशनलाही चौथ्या नाही तर पाचव्या क्रमांकासाठी पाहिले जात आहे.
आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंडया, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव)




























































