
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने मंगळवारी शुक्रावरची मोहीम जाहीर केली आहे. सूर्यमालेतला शुक्र हा सर्वाधिक चमकदार ग्रह मानला जातो. चंद्र, सूर्यानंतर आता शुक्रावर मोहीम आखली जाणार आहे, अशी माहिती इस्रोने दिली आहे.
इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी नवी दिल्ली येथे भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीला संबोधित करताना ही माहिती दिली आहे. सध्या इस्रोच्या समोर अनेक योजना आहेत. शुक्रावर स्वारीसाठी आधीच एका मोहिमेची आखणी केली गेली आहे. त्यासाठी पेलोडही विकसित करण्यात आले आहेत. शुक्र हा एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे आणि त्याचा शोध अंतराळ विज्ञानातील क्षेत्रातील काही प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी होईल, असं सोमनाथ यांचं म्हणणं आहे.
शुक्र हा एक विशेष ग्रह आहे. त्याचं वातावरण खुपच सघन आहे. वातावरणाचा दाब हा पृथ्वीच्या शंभरपट अधिक आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर विविध अॅसिड आहेत. त्यामुळे आपण त्याच्या पृष्ठभागावर प्रवेश करू शकत नाही. कारण तो पृष्ठभाग कठोर आहे किंवा नाही ते सांगता येत नाही. त्यामुळे हेच शोधण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कदाचित पृथ्वीही भविष्यात अशीच दिसू लागेल. कदाचित 10 हजार वर्षांनंतर पृथ्वीवरील निसर्ग नष्ट झालेला असेल, असं होऊ शकेल. त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचं आहे.





























































