शिवतीर्थावर जनसागर उसळणार, दसरा मेळावा अभुतपूर्व होणार! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एकच मैदान, एकच पक्ष आणि एकच नेता’ अशी वैभवशाली परंपरा आणि तब्बल सहा दशकांच्या ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा असलेल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात या वर्षीदेखील शिवसेनेच्याच वाघाची डरकाळी घुमणार आहे. याची तयारी जोरात सुरू आहे. बाजारात डुप्लिकेट माल खुप असतो, पण परंपरेने शिवतीर्थावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याने महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचे काम गेले 55 वर्ष केले आहे. यंदाही दसरा मेळावाही अभुतपूर्व होईल आणि शिवतीर्थावर जनसागर उसळेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

दसरा मेळावा दोन नाही, तर एक तो म्हणजे शिवतीर्थावर. काही लोक चायनीज भेळच्या गाड्या इकडे-तिकडे लावतादत, पण ते काही खरे चायनीज नसते. बाजारात डुप्लिकेट माल खुप असतो. डुप्लिकेट माल बाजारात येतो आणि काही काळ राहतो. दिवाळीलाही चिनी पणत्या, फटाके येतात, पण त्यांचा आवाज किती असतो हे सर्वांना माहितीय, असा टोला राऊत यांनी मिंधे गटाला लगावला.

दसरा मेळाव्याची तयारी जोरात सुरू असून महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता येईल. 2024च्या महाराष्ट्रातील आणि देशातील परिवर्तनाची सुरुवात दसरा मेळाव्यातूनच होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजप नेतेही उद्धव ठाकरे किती वाजता बोलणार याची विचारणा करत आहेत. दिल्लीमध्येही मोदी आणि शहा यांना उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता आहे, असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात प्रचंड दहशत असून दडपशाही सुरू आहे. पोलीस, तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. शिवसेना, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, महाविकास घाडीच्या नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याची कोणतीही कसर फडणवीस आणि त्यांचे सरकार सोडत नाही. खोटं बोला, पण रेटून बोला हा त्यांचाच शब्द असून ते शब्दाला जागत आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला. ललित पाटील शिवसेनेचा शहरप्रमुख होता असे फडणवीस म्हणतात. पण आज आम्ही यादीच दिली असून तो साधा शाखाप्रमुख किंवा गटप्रमुखही नव्हता. मंत्रीमंडळात तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले तुमचेच लोक त्याला पोसत होते. गृहमंत्री खोटं बोलत असून त्यांचे त्यांच्या खात्यावर नियंत्रण नाही किंवा गुप्तचर विभाग त्यांना चुकीची माहिती देत आहे. एवढे अपयशी गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिले नाहीत, असेही राऊत म्हणाले.

पोलिसांनी या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास करावा. नांदगावपासून ते मालेगावपर्यंत हप्ते कसे जात होते याचा रेकॉर्ड पोलिसांकडे आला आहे. त्यामुळे मंत्रीमंडळातील पोपट बोलू लागले आहेत, त्यांना घाम फुटला आहे, त्यामुळे ते आरोप करत सुटले आहेत. पोलिसांवरही याचे नाव घ्या, त्याचे नाव घ्या म्हणून दबाव येईल. मात्र ललित पाटीलचा शिवसेनेचा काडीमात्रही संबंध नाही. दादा भुसे आपला खास माणूस म्हणून त्याला घेऊन आले आणि उद्धव ठाकरे यांना शिवबंधन बांधायला लावले. एखाद्या जिल्ह्यातील कार्यकर्त्याबाबत आम्हाला माहिती नसते, पण तुम्हाला माहिती असणारे आरोपी तुम्ही सोबत घेतले. अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, राहुल शेवाळे, प्रताप सरनाईक, भावना गवळी किती नावं घ्यायची. यांना मुलुंडचा नागडा पोपटलाल तुरुंगात टाकणार होता, पण आज ते मंत्रीमंडळात बसले आहेत. जनतेला सर्व कळतंय, असेही राऊत म्हणाले.