प्रासंगिक – शिक्षणाचे शिलंगण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैजनाथ महाजन

शिलंगणाचा  पूर्वापार अर्थ असा आहे की, गावाची वेस ओलांडून चतुःसीमांच्या दिशेने काहीना काही नवे करण्याकरिता बाहेर पडायचे. कधी काळी याचा अर्थ बाहेरून तलवार गाजवून वेशीतून वाजतगाजत मिरवणुकीने यशस्वी होऊन गावात यायचे. अशा रीतीने पराक्रम करून आलेल्या पौत्रपुत्रांना घरात नव्याने आलेल्या धान्याच्या समीप अथवा प्रतीकात्मक पद्धतीने त्या धान्यावर बसवून त्यांना ओवाळायचे. आजही काही काही खेडय़ांत ही प्रथा दिसून येते. यातूनच या दिवसाला विजयादशमी असे म्हणण्याचा विचार रुजलेला दिसतो. याच दिवशी पांडवांनी आपला वनवास संपवून शमीच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेली आपली शस्त्रे पुन्हा परजण्यासाठी बाहेर काढली. म्हणून या दिवशी शमीची पाने एकमेकांना देऊन सोने घ्या आणि सोन्यासारखे रहा अशा शुभेच्छा दिल्या जातात. कालांतराने शमीची पाने उपलब्ध होईनाशी झाली म्हणून त्या पानांची जागा आपटय़ाच्या द्विदल पानांनी घेतली.

आज जग झपाटय़ाने बदलत आहे. आजचे उद्या असत नाही इतका हा बदलाचा प्रचंड वेग आहे. अशा काळाच्या पार्श्वभूमीवर आता शिलंगणासाठी बाहेर पडायचे म्हणजे शिक्षणाच्या शिलंगणासाठी बाहेर पडायचे. आजच्या तरुणाईला देश-विदेशातील नवनवीन अभ्यासक्रम, नवनवीन उपक्रम आणि तितक्याच आश्वासक अशा पदव्या खुणावत आहेत. कधी काळी तारुण्यात पर्दापण करणाऱ्या- तरुणांना आधीची पिढी  काहीतरी नवेच करा असे सांगत असायची, पण नेमके काय करायचे हे मात्र फारसे कुणाला सांगता यायचे नाही. आज सांगण्याची जागा असंख्य यांत्रिकी उपकरणांनी घेतलेली आहे आणि इतकेच नव्हे, ज्यांना देश-विदेशात जाणे शक्य नाही त्यांना घर बसल्यासुद्धा हवे ते शिक्षण घेण्याची सुलभ व्यवस्था निर्माण होते आहे. फक्त तुमच्याकडे इच्छाशक्ती आणि अपेक्षित अशी बुद्धिमत्ता हवी.

अलीकडेच आपल्याकडे ‘भुरा’ हा अत्यंत उद्बोधक आणि नव्या क्षितिजाला पेलवून दाखविणारा असा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. शरद बाविस्कर हा धुळे जिल्हय़ातील दहीवले या गावातील मुलगा शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईत येतो. महप्रयासाने मुंबई विद्यापीठात प्रवेश मिळवितो आणि परकीय भाषांच्या अभ्यासाला वाहून घेतो. इंग्रजी उत्तम असतेच. त्याशिवाय तो जर्मन, फ्रेंच अशा भाषांवर प्रभुत्व मिळवतो. आणखीन शिक्षणाला अमेरिकेला जातो. तिथे इटालियन भाषा शिकतो. आज तो लंडन विद्यापीठात अशा भाषांचा विभागप्रमुख म्हणून काम करतो आहे. सांगली जिल्हय़ातील कौवलापूर या गावातील एक तल्लख तरुण विलिंग्डन महाविद्यालयात दाखल झाला. अल्पावधीत तो प्राचार्य व्ही. के. गोकाक यांचा आवडता विद्यार्थी झाला आणि बी.ए.ला इंग्रजी घेऊन मुंबई विद्यापीठात पहिला आला. त्याला ‘एलिस’ हा त्या काळातील अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आणि तो दसऱ्याला गावी परतला व त्याने आपण आता उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जात असल्याचे जाहीर केले. त्या वेळच्या भाषेतील विलायतीला गेला आणि बॅरिस्टर झाला, पण बॅरिस्टर होऊन खोऱ्याने पैसे मिळवण्यापेक्षा त्याने कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मानसपुत्र होऊन तहयात रयत शिक्षण संस्थेची समर्पित भावनेने सेवा केली. त्याच्या इंग्रजीचा बोलबाला देशभर झाला. त्याचे नाव बॅ. पी. जी. पाटील.

आजच्या तरुणाईला तर दाहीदिशा खुल्या झालेल्या आहेत. अभ्यासाची क्षेत्रे पण झपाटय़ाने विस्तारत आहेत. स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळविण्याचे स्वप्नसुद्धा आजच्या बुद्धिवंत तरुणांना फारसे खुणावत नाही, तर त्यापुढे जाऊन आणखी काहीतरी केले पाहिजे असे वाटते आहे. ‘आकांक्षा पुढती दिसे गगन ठेंगणे’ हे आज म्हणण्यासाठी राहिलेले नाही, तर त्याचे आज साक्षात सुखद दर्शन होत आहे. शिलंगणाला नवा आयाम प्राप्त होतो आहे आणि तोसुद्धा नवनवीन आशय घेऊन येणारा असा आकार घेताना पाहायला मिळत आहे. कधी काळी विमान प्रवासाची अपूर्वाई वाटत असायची. आज विमान प्रवासाने विविध देशांच्या सीमा उल्लंघत नवनवीन पद्धतीने सीमोल्लंघन केले जात आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जे जे करील तयांचे हेच समर्थांचे रास्त वचन या काळाचे बोधवाक्य होऊन दाहीदिशा उजळून टाकत आहे. शिक्षणाच्या शिलंगणाचा हाच तेजोमयी अर्थ आहे.