
भाजपकडून ज्या नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप सातत्याने करण्यात आले, तेच मलिक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसले. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही,’ असे म्हणणारे आज त्यांच्यासोबत कसे? असा सवाल केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलो, असे सांगत मलिकांची सकाळी पाठराखण केली. दानवे यांनी भरसभागृहात प्रश्न उपस्थित करून दिलेल्या दणक्यानंतर भानावर आलेल्या फडणवीस यांनी अखेर संध्याकाळी माघार घेत मलिक यांना सोबत घेऊ नका, असे पत्र अजित पवार यांना पाठवत कोलांटउडी मारली.
देशद्रोहाचा आरोप असलेल्या मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आज चांगलीच काsंडी झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच सत्ताधाऱयांचा अक्षरशः तीळपापड झाला. दानवे यांनी मलिक यांचा मुद्दा मांडताच सभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी दुसऱया सभागृहातला मुद्दा इथे मांडता येत नाही असे सांगितले. त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी गदारोळ केला. दानवे हे विषयांतर करत आहेत, असे ते म्हणाले. त्यावर दानवे संतप्त होऊन देसाईंना म्हणाले की, मला बंधन घालणारे तुम्ही कोण? मला हा मुद्दा मांडायचाच आहे. मला त्यावर बोलायचे आहे. तुम्ही मला अडवू शकत नाही, सभापती मला सांगतील. कुख्यात दाऊद इब्राहिम याच्याशी कोणते व्यवहार झाले? याविषयी सरकारची भूमिका काय आहे एवढेच जाणून घेण्याची आमची इच्छा आहे, अशी सडेतोड भूमिका दानवे यांनी मांडत सत्ताधाऱयांची बोलतीच बंद केली.
”सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. मलिक सध्या केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे हे योग्य होणार नाही” – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
पत्रात काय?
नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य नाही, असे आमचे मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचार घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, असे फडणवीसांनी अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

























































