
नव्या संसदेच्या सुरक्षेवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरणाऱ्या खासदारांचे निलंबन करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. अवघ्या तीन दिवसांत तब्बल 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या मुद्दावरून भाजपवर सडकून टीका केली आहे. लोकशाहीच्या मंदिराची प्रतिष्ठा कायम राहायला हवी मात्र लोकशाहीच्या पवित्र मंदिराचे स्मशान केले आहे असे राऊत यांनी म्हटले. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराचे स्मशान करून तुम्ही राम मंदिरात जाऊन नौटंकी करणार असाल तर तो राम तुम्हाला पावणार नाही अशा शब्दात राऊत यांनी टीका केली.
दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, तुम्ही संसदेच्या प्रतिष्ठेला आग लावायला निघाला आहात. असे असले तरी देशातील 140 कोटी जनता सती जाणार नाही, ती लढत राहील. काल विरोधी पक्षांची बैठक झाली त्यात याविषयावरही चर्चा झाली. त्या बैठकीत कुठेही निराशेचा सूर दिसला नाही, 2024 साली भाजपवर निराश आणि वैफल्याने ग्रस्त होण्याची वेळ येईल.
दिल्लीमध्ये मंगळवारी इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध इंडिया आघाडीकडेही एक चेहरा असायला हवा, असे मतप्रदर्शन बैठकीत अनेक नेत्यांनी केले. पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे योग्य ठरतील, असे सांगत तृणमूल काँगेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी खरगेंच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत ठेवला. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी म्हटले की, या विषयावर काल पहिल्यांदाच चर्चा झाली. बहुसंख्य पक्षांनी खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली. ही चर्चा सकारात्मक झाली. खरगेंच्या नावाच्या प्रस्तावासंदर्भात काँग्रेस पक्षात चर्चा होईल. त्यानंतर आम्ही निर्णयापर्यंत येऊ. अत्यंत विचारपूर्वक हा प्रस्ताव आलेला आहे. प्रस्तावावर एकमत होण्यासाठी थोडा वेळ लागेल.
























































