भाजपला आता महागाई डार्लिंग वाटते का? काँग्रेसचा मोदी सरकारला खोचक सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीआधी किमती कमी करायच्या आणि नंतर वाढवायच्या हा भारतीय जनता पक्षाचा ‘चुनावी जुमला’ असल्याची टीका काँग्रेसने आज केली. राजस्थानमध्ये 450 रुपयांना तर उत्तर प्रदेशात दोन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे काय झाले? ‘महंगाई डायन’ म्हणणाऱया भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्ंलग’ वाटते का? असा खोचक सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून घरगुती गॅसच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेची काँग्रेसने आज चीरफाड केली. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवत्ते अतुल लोंढे यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. 2014 पर्यंत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार सबसीडी देऊन गॅस सिलिंडर 410 रुपयांना देत होते. मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी ही सबसीडी शून्यावर आणली आणि 410 रुपयांचा गॅस सिलिंडर 1200 रुपयापर्यंत महाग केला, असे लोंढे म्हणाले.

यूपीए सरकारच्या काळात कच्चे तेल 112 डॉलर प्रति बॅरल होते तेव्हा 72 रुपये लिटर पेट्रोल होते. युपीए सरकार 3.54 रुपये कर आकारत होते तो कर मोदी सरकारने वाढवून 33 रुपये केला आहे. या करातून मोदी सरकारने 35 लाख कोटी रुपये जनतेकडून लुटले. आज 106 रुपये लिटर पेट्रोल असतानाही ते महाग असल्याचे वाटत नाही का? असा सवाल अतुल लोंढे यांनी केला.