सांगोल्याच्या आमदाराने ‘त्या’ डायलॉगशिवाय काय दिले? आमदार रोहित पवार यांचा गद्दारांवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्षाशी गद्दारी करून फुटून गेलेले आमदार हे पुन्हा निवडून येणार नाहीत. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे सांगत सांगोल्याच्या आमदाराने ‘काय झाडी, काय डोंगार’, या एका डायलॉगशिवाय पाच वर्षांत तुम्हाला काय दिले, असा हल्लाबोल आमदार रोहित पवार यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर केला. दरम्यान, युवा वर्ग, शेतकरी, कष्टकऱयांसाठी लढतोय म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, जनता सोबत आहे, त्यामुळे मी कारवाईला घाबरणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी भाजप सरकारला दिला.

शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व महाविकास आघाडी यांच्या वतीने आज सांगोल्यात भव्य शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी रतनबाई गणपतराव देशमुख, शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील, प्रवीण गायकवाड, राजू कोरडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, अभिजित पाटील, बाबूराव गायकवाड, भरत शेळके, मारुती बनकर, बाळासाहेब एरंडे, सूर्यकांत घाडगे, अरविंद पाटील, नवनाथ पाटील, अभिषेक कांबळे, तोहीद मुल्ला उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, भाजपला कुणाचेही घेणे-देणे नसून फक्त स्वतःचे हित पडले आहे. युवकांसाठी असणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. महाराष्ट्राचा शेतकरी अडचणीत असतानादेखील आज कृषिमंत्री दिसत नाहीत. सध्याच्या सरकारला कुटुंब, संघटना फोडण्यासाठी वेळ असून सर्वसामान्यांसाठी वेळ नाही. सध्याचे सरकार पुन्हा आले तर संविधान व लोकशाही जिवंत राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत दबावतंत्र वापरण्यात येणार आहे. यासाठी आपणा सर्वांनी एकजुटीने लढावयाचे आहे, असे आवाहन पवार यांनी केले.

पक्षाशी गद्दारी करून फुटलेले आमदार उद्या आमदार नसणार आहेत, असे सांगत तुमचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांनी ‘काय झाडी, काय डोंगार’ या एका डायलॉगशिवाय पाच वर्षांत तुम्हाला काय दिले, असा सवाल केला. ‘काय वातावरण, काय लोक, काय लोकांचे प्रेम, काय इथला स्वाभिमान’ हे पाहण्यासाठी आम्ही सांगोल्यात येतो आणि तुमचे आमदार झाडी, डोंगर बघण्यासाठी दुसऱया राज्यात जातात, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता इंडिया आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. देशामध्ये इंडिया आघाडी भक्कम असून, आघाडीमध्ये मतभेद नाहीत, असे शेकाप चिटणीस भाई जयंत पाटील यांनी सांगितले.