कारचा धक्का लागला म्हणून रिक्षाचालकानं मारहाण केली, माजी आमदाराचा बेळगावमध्ये धक्कादायक मृत्यू

कारचा धक्का लागला म्हणून रिक्षाचालकाने गोव्याचे माजी आणि काँग्रेस नेते लवू मामलेदार (वय – 68) यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर लॉजमध्ये पायऱ्या चढताना ते अचानक कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली असून कर्नाटक पोलिसांनी रिक्षाचालक मुजाहिद शकील जमादार (वय – 28) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवू मामलेदार हे व्यावसायिक कामानिमित्त बेळगाव येथे आले होते. बेळगाव शहरातील खडेबाजार भागातील श्रीनिवास लॉजजवळ दुपारी दीडच्या सुमारास त्यांची कारचा धक्का एका रिक्षाला लागला. याचा राग आल्याने रिक्षाचालक मजाहिद शकील जमादार याने मामलेदार यांना मारहाण केली. या घटनेनंतर मामलेदार हे लॉजच्या पायऱ्या चढत असताना खाली कोसळले. त्यांना तातडीने बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रिक्षाचालकाला अटक

मामलेदार यांना मारहाण केल्यानंतर रिक्षाचालक फरार झाला होता. मात्र मामलेदार यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागे झाले आणि पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचालकाची ओळख पटवत त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली जात आहे.

कोण होते मामलेदार?

लवू सूर्याजी मामलेदार हे पौंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. 2012 ला ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकीटावर निवडून आले होते. 2017 मध्ये त्यांना येथून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र येथे ते जास्त रमले नाहीत आणि 2022 मध्ये त्यांनी काँग्रेसचा हात हाती घेतला.