सुपरबाईक रेसिंगच्या नव्या युगाला सुरुवात, हिंदुस्थानमध्ये रंगणार वेगाचा थरार

हिंदुस्थानमध्ये सुपरबाईक रेसिंगच्या नव्या युगाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी एका कार्यक्रमामध्ये बहुप्रतीक्षित असलेल्या इंडियन सुपरबाईक लीगची (आयएसबीएल) घोषणा करण्यात आली. हिंदुस्थानातील रेसर्सना आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव मिळण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील उद्देश आहे. त्यामुळे या स्पर्धेत फक्त हिंदुस्थानी रेसर्स सहभागी होऊ शकणार आहेत असे आयोजकांनी सांगितले.

फेडरेशन मोटरस्पोर्टस क्लब्स ऑफ इंडियाच्या (एफएमएससीआय) मान्यतेने होत असलेली ही स्पर्धा या वर्षाच्या अखेरीस रंगेल. पुढील काही महिन्यांत या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होणार आहे. तीन फेऱ्यांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेतील शर्यती चेन्नई, बंगळुरू आणि मुंबई-पुणे येथे पार पाडतील. ऑक्टोबर ते डिसेंबर यादरम्यान ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील प्रतिभेला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

एफएमएससीआयचे अध्यक्ष अरिंदम घोष; कौन्सिल सदस्य आणि एफएमएससीआयचे माजी अध्यक्ष विकी चांडोक, एफएमएससीआय टू-व्हीलर रेसिंग कमिशनचे अध्यक्ष एम.आर. दस्तूर; डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्रा; आणि आयएसबीएलचे संचालक शिरीष विस्सा हे यावेळी उपस्थित होते.