दवाखान्यांमध्ये रुग्णांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक, मुंबई महापालिकेची डिजिटल आरोग्य सेवेची सुरुवात

मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये गेल्यावर केसपेपर काढा, नाव नोंदवा या गोष्टी आता इतिहासजमा होणार असून मुंबई महापालिका 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पालिका दवाखान्यांमध्ये (एचएमआयएस प्रणाली) डिजिटल सेवा सुरू करणार असून मोठ्या रुग्णालयांप्रमाणे रुग्णांना डिजिटल क्रमांक (आयडी) देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात या ओळखपत्राच्या आधारे रुग्णांना दवाखान्यातून रुग्णालयात तसेच रुग्णालयातून दवाखान्यात उपचार घेता येणार आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबईकरांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने अभिनव कार्यप्रणाली सुरू केली आहे. त्याची सुरुवात 2 मेपासून केली जाणार आहे. मुंबईतील सर्व पालिका दवाखान्यांमध्ये आधुनिक पद्धतीने आरोग्य सेवा पुरवण्यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (एचएमआयएस-2) ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये आधुनिकता, कार्यक्षमतेची वृद्धी आणि सेवा वितरणामध्ये गती साधण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

अशी होणार अंमलबजावणी…

  • एचएमआयएस-2 प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी सर्व दवाखान्यांना आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा व संबधित यंत्रासामग्री देण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. या आधी रुग्णांच्या नोंदी या पेपरवर केल्या जात होत्या. मात्र, आता त्यांना डिजिटल क्रमांक देण्यात येणार आहे.
  • सुरुवातीला ही प्रणाली 177 दवाखान्यांत सुरू केली जाणार आहे, तर 217 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांमध्येदेखील 30 मेपर्यंत ही प्रणाली सुरू केली जाणार आहे.
  • पुढील टप्प्यात ही प्रणाली प्रसूतिगृहे, उपनगरीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांच्यातदेखील राबवण्यात येणार आहे.

काय आहे प्रणाली…

या ओळखपत्राच्या आधारे रुग्णांना दवाखान्यातून रुग्णालयात तसेच रुग्णालयातून दवाखान्यात उपचार घेता येणार आहे. त्यांच्या उपचार पद्धतीचा आढावा (ट्रक) घेतला जाऊ शकतो. यामुळे रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या उपचारांच्या सर्व नोंदी एकाच ठिकाणी मिळू शकतील. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी आणि औषध वितरण इत्यादी नोंदी डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत तसेच औषध साठा व्यवस्थापन, रुग्णसेवा अहवाल, सांख्यिकीय विश्लेषण आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेसाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.