कर्जतच्या ‘सुटकेस बॉडी’चे गूढ उकलले, 200 सीसीटीव्हीचा मागोवा घेत पोलिसांची मारेकऱ्यांवर झडप

कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या सुटकेस बॉडीचे गूढ अखेर 25 दिवसांत उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. तपास पथकाने तब्ब्ल 200 सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात एका महिलेचाही समावेश असून मृत महिला आणि आरोपी हे मित्र असल्याचे समोर आले आहे. व्ही. विजयकुमार व्यंकटेश आणि टी. यशस्विनी राजा असे दोघा आरोपींची नावे असून मृत महिलेचे नाव धनलक्ष्मी यरप्पा रेड्डी असे समोर आले आहे. हे तिघेही पवई येथे राहत होते.

16 एप्रिल रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर कर्जतजवळील ठाकूरवाडी स्टेशन परिसरात गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडून आला होता. 15 एप्रिल रोजी आरोपी व्ही. विजयकुमार व्यंकटेश व टी. यशस्विनी राजा ही महिला लोकमान्य टिळक टर्मिनल फलाट क्रमांक चारवर आले. यावेळी सुटकेस घेऊन जाताना ते बळाचा वापर करत असल्याचे लक्षात आल्याने हेच आरोपी असावे अशी दाट शक्यता निर्माण झाली. दरम्यान, बंगळुरू स्थानकात व्यंकटेश व टी. यशस्विनी रिकाम्या हात उतरल्याचे पोलिसांना दिसून आल्याने त्यानुसार तपासाची चक्रे फिरवण्यात आली.

20 हजारांचे बक्षीस जाहीर
मृत धनलक्ष्मी अविवाहित होती. ती मूळची आंध्र प्रदेशातील हंमप्पा पुरम रायपाडू रायताडू येथील रहिवासी होती. 16 तारखेपर्यंत आरोपींना पोलिसांना कोठडी सुनावली आहे. तपासात नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप फड, पोलीस शिपाई श्रीकांत, पोलीस शिपाई बेंद्रे, शिपाई वांगणेकर, वाघमारे, दवणे यांनी खुनाचा तपास लावण्यात मोठे यश मिळविले. या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पथकातील पोलिसांना 20 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.