1971 ची गोष्ट वेगळी होती, आपल्याला आता शांतता हवी आहे; काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे मत

आपल्याला दहशतवाद्यांना धडा शिकवायचा होता आणि आपण तो शिकवला आहे असे मत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. तसेच 1971 ची गोष्ट वेगळी होती, आपल्याला आता शांतता हवी आहे असेही थरूर म्हणाले.

एएनआयशी बोलताना शशी थरूर म्हणाले की, दोन्ही देशांत तणाव वाढला होता. हिंदुस्थानला शांतता हवी आहे. पूंछमधील लोकांना विचारा की किती लोक मारले गेले. युद्ध थांबवलं पाहिजे अशी माझी भूमिका नाहीये. पण जेव्हा गरज असेल तेव्हाच लढलं पाहिजे. पण हे युद्ध आपल्याला सुरू ठेवायचं नाहिये. आम्हाला फक्त दहशतवाद्यांना धडा शिकवायचा आहे आणि तो आम्ही शिकवला आहे.

तसेच पहलगाम हल्ल्यात ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांच्या मारेकऱ्यांना शोधलं पाहिजे. ही बाब अतिशय गरजेची आहे. या गोष्टीला वेळ लागेल, पण निर्दोष नागरिकांना मारणाऱ्यांना सोडता कामा नये. याचा अर्थ असा नाही की आपण संपूर्ण देशाला एका मोठ्या युद्धात ढकलून द्यायचं.

थरूर म्हणाले की यावेळी पाकिस्तानसोबत आणखी युद्ध वाढवण्याची गरज नव्हती. आपल्या सैनिकांचे आयुष्य धोक्यात टाकायचं नव्हतं. हिंदुस्थानने आपल्या लोकांची समृद्धी, विकास आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यावेळी शांतीचा मार्गच आपल्यासाठी योग्य आहे.

तसेच 1971 साली झालेला विजय आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा नकाशा बदलला होता. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आजचा पाकिस्तान वेगळा आहे. त्यांच्या हत्यारं आहेत, सैन्य आहे. 1971 चे युद्ध हे बांगलादेशला स्वांतत्र्य देण्याचे एक नैतिक लक्ष्य ठेवून लढलं होतं असेही थरूर म्हणाले.