व्हॉट्सअॅपवर मालवेअर व्हायरसचा धुमाकूळ, एक मेसेज करू शकते बँक खाते रिकामे

व्हॉट्सअॅपवर अनोळखी क्रमांकावरून फोटो पाठवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. ‘तुम्ही यांना ओळखता का?’ अशी विचारणा केल्यानंतर आपण उत्सुकतेने फोटो डाउनलोड करताच मोबाईलमध्ये मालवेअर व्हायरसचा शिरकाव होतो. त्यामुळे आपली सर्व गोपनीय माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचते. परिणामी बँकेशी संपर्क करण्याच्या आत हे गुन्हेगार पैसे ट्रान्सफर करून पसार होतात. मोबाईलमध्ये व्हायरस शिरल्यास गुन्हेगारांना अधिक माहिती मिळवण्यासाठी फोटो, सोशल मीडिया अकाऊंट अथवा ओटीपीची गरज भासत नाही.

सायबर गुन्हेगारांकडून जीआएफ, जेपीजी, पीएनजी, एमपी3, एमपी4 आणि पीडीएफएस अशा फॉरमॅटमध्ये व्हायरस जोडून हा स्पॅम केला जातो, असे सायबर तज्ञ सांगतात. या माध्यमातून मालवेअर व्हायरस नकळत फोनमध्ये डाउनलोड होतो. याशिवाय स्टेग्नोग्राफी तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची नक्कल करून व्हॉईस मेसेज अथवा फोन कॉल केला जातो.

काय काळजी घ्यायची?

अज्ञात क्रमांकावरून येणारे फोटो, व्हिडीओ डाउनलोड न करण्यास प्राधान्य द्यायला हवे. व्हॉट्सअॅपच्या सेटिंगवर जाऊन स्टोरेज आणि डेटा या पर्यायावर क्लिक करून ऑटो डाउनलोड होणारे फोटो आणि व्हिडीओ तसेच व्हॉईस मेसेजचा पर्याय बंद करण्याचा सल्ला दिला जातो.