
विभक्त पत्नीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीला स्वतःकडे ठेवणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाने आज फटकारले. वडिलांची कृती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत, तुमच्या वादापासून मुलीला दूर ठेवा अशा शब्दांत न्यायालयाने जोडप्याला फटकारले. इतकेच नव्हे तर, मुलीच्या नीट संगोपनासाठी त्याचा ताबा आईकडे सोपवण्याचे आदेश दिले.
विभक्त पतीने पाच वर्षांच्या मुलीला तिच्या ताब्यातून जबरदस्तीने नेले असा दावा करत महिलेने हायकोर्टात हेबिअस कॉर्पस (व्यक्तीला न्यायालयात हजर करा) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी सुट्टीकालीन न्यायालयाने न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी महिलेने दावा केला की, तिच्या विभक्त पतीने त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीला तिच्या ताब्यातून जबरदस्तीने नेले आणि तिला परत देण्यास नकार दिला.