
पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून सुटून आलेल्या बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांचा पाकिस्तानच्या तुरुंगात मानसिक छळ झाल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. शॉ यांनी पत्नीशी फोनवरून संवाद साधला. या संभाषणाबाबत तीने प्रसारमाध्यमांना सांगितले. शॉ यांना एखाद्या गुप्तहेराप्रमाणे वागणूक दिली गेली. 21 दिवसांत त्यांना तीन वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले. एक ठिकाण तर हवाई दलाच्या तळानजीक होते. तिथून रोज विमानांचे आवाज येत असल्याची माहिती शॉ यांनी दिल्याचे त्यांची पत्नी रजनी शॉ यांनी सांगितले. पूर्णम शॉ यांना वेळेवर जेवण दिले जायचे, पण दात घासू दिले नाहीत. ते खूप थकलेले वाटत होते, कारण त्यांना बरेच दिवस झोप मिळालेली नाही असा त्यांचा चेहरा होता, असेही रजनी शॉ म्हणाल्या.