हिंदुस्थानने किती विमाने गमावली? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केंद्र सरकारला काही गंभीर प्रश्न विचारले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानने किती विमाने गमावली, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केल्या एका वक्तव्यावरून त्यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडलं आहे. राहुल गांधी यांनी सरकारला विचारलं आहे की, हल्ल्यापूर्वी सरकारने पाकिस्तानला का कळवले? यामुळे आपण किती लढाऊ विमाने गमावली?

राहुल गांधी यांनी X वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, “आमच्या हल्ल्याच्या आधी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीरपणे कबूल केले आहे की, हिंदुस्थानी सरकारने हे केले.” याच पोस्टमध्ये त्यांनी सरकारला दोन प्रश्न विचारले आहेत की, “हे कोणी अधिकृत केले? यामुळे आपल्या हवाई दलाची किती विमाने गमावली?”