
देशातील पाकपुरस्कृत दहशतवाद जुनाच आहे. मोदी त्या दहशतवादाचे कंबरडे मोडणार होते, पण आता पाकविरुद्ध राग आळविण्यासाठी त्यांना जगभरात खासदारांची पथके पाठवावी लागत आहेत. याला काय म्हणायचे? या कृतीमुळे पाकिस्तानचे महत्त्व आपण वाढवीत आहोत, हा इशारा आम्ही आजच देऊन ठेवत आहोत. खरे तर ‘पाकिस्तानला हल्ले व ठिकाणांची पूर्वकल्पना देऊन भारताने हल्ले केले’ असे वेडपट विधान करणाऱ्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना नारळ दिलाच पाहिजे. दुसरे म्हणजे ‘भारतावर दहशतवादी हल्ला होत असताना तुमचे अंतर्गत सुरक्षा मंत्री म्हणजे गृहमंत्री श्री. शहा काय करीत होते?’ असा प्रश्न जागतिक स्तरावर विचारला तर ही सरकारी शिष्टमंडळे काय बोलणार? सगळाच गोंधळ आहे. वऱ्हाड लंडन, आफ्रिका, अमेरिकेला निघाले आहे. त्यांना शुभेच्छा!
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी शस्त्रसंधी प्रयोगानंतर मोदी सरकारने आणखी एका प्रयोगाची घंटा वाजवली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर प्रकाश पाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगातील अनेक देशांमध्ये पाठवायचे ठरवले आहे. सरकारनेच खासदारांच्या पथकांची व पथकांच्या नेत्यांची निवड केली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय खासदारांना (?) सरकारी खर्चाने विदेशवारी घडणार आहे. पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या दरम्यान ज्या सर्वपक्षीय बैठका पार पडल्या, त्यात विरोधी पक्षांकडून दोन मागण्या प्रामुख्याने झाल्या. पहिली मागणी म्हणजे संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवून पहलगाम हल्ला व कश्मीर प्रश्नावर चर्चा घडावी. त्या चर्चेत पंतप्रधानांनी हजर रहावे. दुसरी मागणी म्हणजे सर्वपक्षीय शिष्टमंडळ सरकारच्या नेतृत्वाखाली कश्मीरात न्यावे व तेथील जनतेला आधार द्यावा. या दोन्ही मागण्यांना केराची टोपली दाखवून सरकारने ‘निवडक सर्वपक्षीय’ खासदारांना विदेश यात्रा घडवायचे ठरवले आहे. मोदी सरकारचे शेपूट काही झाले तरी वाकडे ते वाकडेच राहणार हे यानिमित्ताने सिद्ध झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ व पहलगाममधील हल्ल्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. विदेशात शिष्टमंडळे पाठवण्याआधी या विषयावर संसदेत चर्चा होणे गरजेचे होते. तसे झाले नाही. पाकिस्तानच्या भारतातील दहशतवादी कारवायांची माहिती ही खासदार मंडळी विदेशात जाऊन देणार म्हणजे नक्की काय करणार? भारत कश्मीर प्रश्नाचे स्वतःहून आंतरराष्ट्रीयीकरण करण्याची घोडचूक करीत आहे. इस्रायल-हमास युद्ध सुरूच आहे व हमासचा खात्मा करताना
गाझा पट्टीत निरपराध लोक
मारले जात आहेत. हमासवाले इस्रायलमध्ये घुसून दहशतवादी कारवाया करीत असल्याचे रडगाणे गायला नेतन्याहू साहेबांनी जगभर शिष्टमंडळे पाठवलेली नाहीत व रशिया-युक्रेन युद्धात या दोन्ही देशांची शिष्टमंडळे जगभ्रमण करताना दिसत नाहीत. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ‘व्हाईट हाऊस’मध्ये घुसून प्रे. ट्रम्प यांना सांगितले की, “साहेब, युक्रेन हे एक सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र आहे. आम्ही आज संकटात आहोत, पण स्वाभिमान गहाण ठेवून कुठे शरणागती पत्करलेली नाही. आम्ही लढू.’’ याउलट भारताचे झाले. भारत-पाकिस्तानात युद्ध रंगले असताना प्रे. ट्रम्प यांनी वॉशिंग्टन येथून दोन देशांत शस्त्रसंधीची घोषणा केली व भारताला डोळे वटारले. हा दहशतवादच आहे. अमेरिकेत जाणारी सर्वपक्षीय शिष्टमंडळे व त्यांचे नेते अमेरिकेला प्रे. ट्रम्प यांच्या घुसखोरीबाबत प्रश्न विचारणार आहेत काय? जगभरात जाणाऱ्या शिष्टमंडळांनादेखील भारत दहशतवादाशी लढत असताना प्रे. ट्रम्प यांनी ही लढाई थांबवून एक प्रकारे पाकिस्तानला कशी मदत केली हे सांगावे लागेल. देशाचे महत्त्व आणि प्रतिष्ठा नक्कीच महत्त्वाची आहे, पण त्याबाबत राजकारण व घिसाडघाई होणे योग्य नाही. काँग्रेसने शिष्टमंडळासाठी ज्यांची नावे दिली त्यात शशी थरूर यांचे नाव नव्हते, पण मोदी सरकारने परस्पर थरूर यांचे नाव घुसवले. थरूर हे अलीकडे रोज मोदींची भजने करतात. त्याचा हा प्रसाद! काँग्रेसचा विरोध डावलून थरूर यांना शिष्टमंडळात घुसवणे हे वेगळ्या प्रकारचे राजकारण आहे. थरूर हे आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार आहेत व राजकारणात येण्याआधी त्यांनी संयुक्त राष्ट्रांत काम केले आहे हे महत्त्वाचे आहे. मात्र काँगेसचा विरोध असताना थरूर यांना घेतले. खासदारांच्या एका गटाकडे त्याचे नेतृत्व दिले. याचा अर्थ सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर
जागतिक पातळीवर देशाची बाजू
मांडण्यात अपयशी ठरत आहेत, असे समजायचे का? आप, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस यांना शिष्टमंडळात स्थान दिले नाही. सुप्रिया सुळे व अमित शहांचा ‘एसंशि’ गट यांचे प्रत्येकी सात-आठ खासदार असताना त्यांना शिष्टमंडळाचे नेतृत्व दिले, म्हणजे मिंधे यांचे पुत्र एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत. हा घोळ राजकीय आणि पोटदुखीचा आहे. हे सर्व लोक परदेशात जाऊन नक्की कोणापुढे भारताची बाजू मांडणार आहेत? भारत इतका कमजोर देश झाला आहे काय की, जगात खासदार पाठवून पाकिस्तानच्या भारतातील दहशतवादी कारवायांविरोधात आपली बाजू मांडावी लागतेय? देशातील पाकपुरस्कृत दहशतवाद जुनाच आहे. मोदी त्या दहशतवादाचे कंबरडे मोडणार होते, पण आता पाकविरुद्ध राग आळविण्यासाठी त्यांना जगभरात खासदारांची पथके पाठवावी लागत आहेत. याला काय म्हणायचे? या कृतीमुळे पाकिस्तानचे महत्त्व आपण वाढवीत आहोत, हा इशारा आम्ही आजच देऊन ठेवत आहोत. वास्तविक जगभरात आपल्या वकिलाती आहेत व ते सर्व राजदूत गेल्या दोन महिन्यांपासून जगभरात हेच काम करीत आहेत. खरे तर ‘पाकिस्तानला हल्ले व ठिकाणांची पूर्वकल्पना देऊन भारताने हल्ले केले’ असे वेडपट विधान करणाऱ्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना नारळ दिलाच पाहिजे. दुसरे म्हणजे ‘भारतावर दहशतवादी हल्ला होत असताना तुमचे अंतर्गत सुरक्षा मंत्री म्हणजे गृहमंत्री श्री. शहा काय करीत होते?’ असा प्रश्न जागतिक स्तरावर विचारला तर ही सरकारी शिष्टमंडळे काय बोलणार? सगळाच गोंधळ आहे. वऱहाड लंडन, आफ्रिका, अमेरिकेला निघाले आहे. त्यांना शुभेच्छा!