
येथील चारमिनार परिसरातील गुलजार हाऊस इमारतीला रहिवासी साखरझोपेत असताना पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. एका दागिन्याच्या दुकानात आग लागल्यानंतर काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले आणि आगीचा धूर तीन मजली इमारतीत पसरला. त्यामुळे अनेक रहिवासी गुदमरले. या आगीत 8 मुलांसह आतापर्यंत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगीतील मृतांबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पहाटे 5.30 वाजता एका दागिन्याच्या दुकानात आग लागली. तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे दुकान आहे. तासाभराने आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या आणि आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
प्रथमदर्शनी ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज असल्याचे अग्निशमन सेवेचे व्यवस्थापकीय संचालक वाय. नागी रेड्डी यांनी सांगितले. आगीची घटना घडल्यास सुटका करून घेता येईल असा एकच मार्ग पायऱ्यांचा आहे, त्यामुळे बचाव करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो, असेही रेड्डी म्हणाले.





























































