
ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती ओक यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 88 वर्षे होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि प्रख्यात दंत शल्यक्रियाकार अजित ओक यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुले, सुना, भावंडे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
वासंती ओक या उत्कृष्ट चित्रकार होत्या. गणपतीची विविध भावमुद्रेतील, आसनातील रूपे त्यांनी कुंचल्यातून चितारली होती. निसर्ग कलाचित्रण आणि अन्य काही चित्रेही वासंतीताईंच्या कलेची साक्षीदार ठरली आहेत. वाचनाचा प्रचंड व्यासंग असलेल्या वासंती ओक यांनी त्यांच्या आत्मवृत्तपर आठवणींचे लिखाणही केले होते. प्रचंड जिद्द, सहनशीलता, संवेदनशीलता, संयम ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. त्यांचे पुत्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक हे ठाण्यातील मो. ह. विद्यालयाचे विद्यार्थी.
या शाळेत न्यायमूर्ती अभय ओक यांचा गौरव झाला तेव्हा वासंतीताई या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिल्या आणि त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात आपल्या मुलाचे कर्तृत्व सांगताना त्यांचा जीवनपट उलगडला होता. 21 मे रोजी रात्री ठाण्यातील कॅसल मिल नाका येथील विकास कॉम्प्लेक्समधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर जवाहरबाग येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.