दहिसर-बोरिवलीत पावसाचे पाणी घरात घुसले, नाल्याचा प्रवाह बदलणाऱ्या बिल्डरच्या चौकशीची शिवसेनेची मागणी

दहिसरच्या आंबेवाडी येथील चांडक बिल्डरने महापालिकेचा नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला तसेच महापालिकेचा रस्ता खासगी दाखवून रस्त्यावरचे स्ट्रीट लाईट काढून टाकले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचे पाणी रहिवाशांच्या घरात घुसले आणि रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. या प्रकरणी बिल्डरची चौकशी करावी तसेच पाणी तुंबणार नाही, हा पालिकेचा दावा फोल ठरला असून यावर ठोस उपाययोजना करा, अशी मागणी शिवसेनेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आर-मध्यचे सहाय्यक आयुक्तांकडे केली.

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाळामुळे लोकांची तारांबळ उडाली असतानाच दहिसरमधील बिल्डरने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. त्यात काही नाल्यांमधून अजूनही 20 टक्क्यांपेक्षा जास्त गाळ काढला गेलेला नाही तर काही ठिकाणी अजून गाळ काढण्याच्या कामाची सुरुवातही झालेली नाही. नाल्यातून काढलेला गाळ रस्त्यावरच असून उचलला गेलेला नाही. रस्त्याचे काँक्रीटीकरण अर्धवट असून दहिसर नदीची साफसफाई झालेली नाही. या सर्व बाबी विनोद घोसाळकर यांनी आर-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिल्या. या सर्व प्रकारची चौकशी करून पाणी तुंबणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना करावे, असे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले.

यावेळी उपविभागप्रमुख उदय सुर्वे, विधानसभा समन्वयक शशिकांत कदम, शाखा समन्वयक अर्जुन यादव, शाखाप्रमुख प्रवीण कुवळेकर, राजू इंदूलकर, उत्तम परब, अक्षय राऊत, युवासेना विस्तारक मानस पुंवर, विभाग अधिकारी जितेन परमार, विधानसभा चिटणीस यश शिंदे, उपविभाग संघटक दीपा चुरी, शाखा संघटक दर्शना भरणे, उपविभाग संघटक कल्पना सरमळकर, शाखा संघटक छाया अमरुळे, नंदा वंजारे, शाखा संघटक ज्युली मेंडोसा, उपशाखा संघटक उज्ज्वला सुर्वे, संजय वेंगुर्लेकर, प्रकाश जगताप, संजय जेठे, समीर शेडगे, प्रकाश कुर्ले, नीता चित्ते, शैला गंगावणे, जय मातोंडकर आदी उपस्थित होते.