पदपथावरील दुकानाला दिलासा नाहीच, हायकोर्टाने फेटाळली अपील याचिका

पदपथावरील दुकान काढून टाकण्याच्या महापालिकेच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देत उच्च न्यायालयाने याविरोधात दाखल झालेली अपील याचिका फेटाळून लावली. सुभाषचंद्र शर्मा यांनी ही अपील याचिका केली होती. पालिकेच्या या आदेशाला शर्मा यांनी नगर दिवाणी न्यायालयात आव्हान दिले होते. दिवाणी न्यायालयाने या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे शर्मा यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्या. गौरी गोडसे यांच्या एकल पीठासमोर शर्मा यांच्या अपील याचिकेवर सुनावणी झाली. नगर दिवाणी न्यायालयाच्या निकालात काही दोष नसल्याचे नमूद करत न्या. गोडसे यांनी शर्मा यांची याचिका फेटाळून लावली.

1986 पासून दुकान

हे दुकान 1986 पासून उपनगरात पदपथावर आहे. पालिकेच्या नियमानुसार ते संरक्षित आहे. त्याचा लाभ मला देण्यात यावा, अशी मागणी शर्मा यांनी केली होती. मात्र या दुकानाला कोणताही परवाना देण्यात आला नव्हता. शर्मा यांना ते दुकान तेथून काढावेच लागेल. तेथून मलनिस्सारण वाहिनी टाकायची आहे, असा दावा पालिकेने केला.