घाबरू नका, सगळं ठीक होईल; राहुल गांधींनी कश्मीरच्या सीमावर्ती भागातील शाळकरी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी जम्मू आणि कश्मीरचा दौरा केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम राबवत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती. या मोहिमेनंतर पाकिस्तानी लष्कराने हिंदुस्थानच्या सीमेवरील गावांमध्ये गोळीबार सुरू केला होता. ज्यामध्ये अनेक हिंदुस्थानी नागरिक जखमी झाले होते तर, काहींचा मृत्यू ही झाला होता. यातच राहुल गांधी यांनी आज सीमावर्ती भाग असलेल्या पूंछ आणि श्रीनगरमध्ये भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली.

या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी ख्रिस्त स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. पाकिस्तानच्या गोळीबारात 12 वर्षीय जुळी भावंडे, झैन अली आणि उर्वा फातिमा यांचा मृत्यू झाला होता. हे दोघे ख्रिस्त स्कूलमध्ये शिकत होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, “तुम्ही धोका, हल्ले आणि भयानक स्थिती पाहिली आहे. पण काळजी करू नका, सर्वकाही ठीक होईल. तुम्ही खूप अभ्यास करा, खूप खेळा, भरपूर मित्र बनवा, हाच या समस्येशी सामना करण्याचा मार्ग आहे.”

दरम्यान, राहुल गांधी यांचा जम्मू-काश्मीरमधील दुसरा दौरा आहे. यापूर्वी त्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना भेटण्यासाठी 25 एप्रिलला श्रीनगरला भेट दिली होती. त्या हल्ल्यात 26 पर्यटकांसह एका स्थानिकाचा मृत्यू झाला होता. तर पुंछमध्ये 7 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानकडून सीमेवरील गावांमध्ये गोळीबार करण्यात आला होता, ज्यात 28 जणांचा मृत्यू झाला आणि 70 हून अधिक जण जखमी झाले.