
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आज सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर सात वाहने एकमेकांवर धडकून दोन जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना कळंबोली येथील एमजीएम आणि खोपोली येथील जाखोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
बोरघाटातील ढेकू गावाच्या परिसरात पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी ४ वाजता वाहतूककोंडीमुळे वाहने थांबली होती. तेव्हा पुण्याहून आलेल्या एका ट्रेलरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रेलर पुढे उभ्या असलेल्या तीन कार, एक एसटी आणि दोन खासगी बसेसवर जोरात आदळला. हा अपघात इतका भीषण होता की स्वीफ्ट कारमधील अश्विनी हळदणकर (३०), श्रेया अवताडे (१७) या दोघींचा जागीच मृत्यू झाला. सारिका अवताडे (३८), सारिका जाधव (९), अविनाश जाधव (३), वसुधा जाधव, अक्षय हळदणकर यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम खोपोलीच्या जाखोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आयआरबीची यंत्रणा, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस, सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातामुळे मुंबईकडे येणारी मार्गिका बंद झाली होती.