क्लासनचे वेगवान अन् विक्रमी शतक

हेन्रिक क्लासनच्या 37 चेंडूंतील वादळी शतकाच्या जोरावर उभारलेला 3 बाद 278 धावांचा हिमालय आणि त्यानंतर जयदेव उनाडकट, इशान मलिंगा आणि हर्ष दुबेने झटपट तीन-तीन विकेट टिपत कोलकात्याच्या 168 धावांत गुंडाळलेल्या डावाने हैदराबादला मोसमातील सर्वोत्तम शतकी विजय साजरा करण्याची संधी दिली. अपयशी कामगिरीमुळे साखळीतच बाद झालेल्या हैदराबादने 110 धावांचा मोठा विजय मिळवत आपल्या आयपीएल अभियानाचा शेवट मधुर केला.

270पेक्षा अधिक धावा फटकावणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार समजत असलेल्या हैदराबादने आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या उभारताना 278 धावांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे हैदराबादने राजस्थानविरुद्ध  6 बाद 286 धावांचा विक्रमी टप्पा गाठत आयपीएलला सलामी दिली होती, तर आज 278 धावांसह समारोप दिला. आयपीएलमधील पहिल्या चारही सर्वोच्च धावसंख्या हैदराबादच्या नावावर आहेत. ही धावसंख्या उभारताना 9 षटकार आणि 7 चौकारांची उधळण करत हेन्रिक क्लासनने 105 धावांची नाबाद क्लासिक खेळी साकारली. त्याने 37 चेंडूंत शतकी टप्पा गाठत आयपीएलच्या इतिहासातील तिसरे वेगवान शतक ठोकण्याचा पराक्रमही केला. अभिषेक शर्मा (32) आणि ट्रव्हिस हेडने (76) 6.5 षटकांत 92 धावांची सलामी दिली. मग हेड आणि क्लासनने अवघ्या 35 चेंडूंत 6 षटकार आणि 7 चौकारांची आतषबाजी करत 83 धावा चोपल्या.

हैदराबादचे 279 धावांचे आव्हान कोलकात्याला झेपलेच नाही. हैदराबादच्या उनाडकटने सुनील नरीनला (31) बाद केल्यानंतर डिकॉक, अजिंक्य रहाणे, रघुवंशी, रिंकू सिंह, आंद्रे रसल लवकर बाद झाल्यामुळे सामन्यातील हवाच गेली. मग हैदराबादने आधीच पराभूत झालेल्या कोलकात्याचा डाव 18.4 षटकांत 168 धावांत संपवला आणि या मोसमातील सर्वात मोठय़ा शतकी विजयाची नोंद केली. मनीष पांडे (37) आणि हर्षित राणा (34) यांनी आठव्या विकेटसाठी 52 धावा केल्यामुळे कोलकात्याला 168 धावांपर्यंत मजल मारता आली.