पालखी तळ आणि विसावा गावांमधील कामे 5 जूनपर्यंत पूर्ण करा; जिल्हा परिषदेकडून गावांत जाऊन पाहणी

पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावरील गावात येणाऱ्या वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांची कामे येत्या 5 जूनपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिल्या. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सर्व पालखी मुक्काम व विसावे गावांमध्ये पालखी मार्गावरील गावातील सोयीसुविधा व नियोजनाची पाहणी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी गावांमध्ये जाऊन केली. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग लोणी काळभोर व कदम वस्ती ते सराटीपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानकाका पालखी मार्गावरील सर्व मुक्काम व विसावे गावांची पाहणी करण्यात आली.

या पाहणीदरम्यान गाव स्तरावर केलेले नियोजन जसे की पालखी तळ व्यवस्था, गाव व परिसराची साफसफाई, पालखी मार्ग, पिण्याचे पाणी, पाण्याचे खोत, वारकऱ्यांची निवास व्यवस्था, वारकऱ्यांना निवारा कक्ष, महिला वारकऱ्यांकरिता हिरकणी कक्ष, आरोग्य बुथ स्वच्छतेकरिता शौचालय उभारणी, वाहतूक नियोजन, अखंडित वीजपुरवठा आदी सोयी सुविधा जिल्हा प्रशासनामार्फत दिल्या जाणार आहेत. त्याची प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन पाहणी करून सूचना देण्यात आल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, अप्पासाहेब गुजर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, पालखी मार्गावरील हवेली, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्याचे गटविकास अधिकारी, विभाग प्रमुख तसेच संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. पालखीदरम्यान सहभागी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही, याकरिता सर्व गावांनी उत्तम सुविधा उपलब्ध करून द्यावी. जी कामे अद्याप अपूर्ण आहेत, ती 5 जूनपर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना गजानन पाटील यांनी केल्या. या कामांसाठी लागणाऱ्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.