
फोन कॉल आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरूणीचा पाठलाग करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला रत्नागिरी पोलिसांनी वसई येथून ताब्यात घेत अटक केली आहे. तरूणीच्या व्हॉटसॲपवर अश्लील मॅसेज करून, तिचे बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून फोटो व्हायरल केले. तसेच त्या तरूणीला अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली गेली होती.
याबाबतचा अज्ञात इसमाविरूध्द खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागोजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपास सुरु केला. त्यावेळी आरोपी वसईत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कृष्णकांत सुभाष वैद्य (28) याला वसई येथून ताब्यात घेत अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, अमंलदार दिपक गोरे, अजय कडू, राम नागुलवार, रमिझ शेख, वैभव ओहळ यांनी केली.


























































