किम जोंगचा कारनामा उघड, उत्तर कोरियात दर पाच मिनिटांनी मोबाईलचे स्क्रीनशॉट

आपल्याला ठाऊक आहे की उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही चालते. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या करामतींमुळे तो जगभरात कुप्रसिद्ध आहे. किम जोंगचा एक नवा कारनामा जगासमोर आलाय. किम जोंगच्या आदेशाने जनतेचे स्मार्टफोन सरकारद्वारे नियंत्रित करण्यात येत आहेत. या नव्या नियमामुळे उत्तर कोरियामधील लोकांना देशाबाहेरील कोणतीही माहिती प्राप्त करता येत नाही किंवा स्वतःच्या स्मार्टफोनचा खासगी वापर करता येत नाही. एवढेच नव्हे तर स्मार्टफोनद्वारे गुप्तपणे दर पाच मिनिटांनी स्क्रीनशॉट घेतला जातो. हे स्क्रीनशॉट एका गुप्त फोल्डरमध्ये सेव्ह केले जातात. फोनच्या युजरला हे स्क्रीनशॉट दिसत नाहीत, मात्र सरकारी यंत्रणा हे स्क्रीनशॉट पाहू शकतात. उत्तर कोरियातील दैनंदिन जीवन आणि प्रत्येक माहितीसंदर्भात फार काटेकोरपणे सेन्सॉरशिप लावली जाते. फक्त स्थानिक इंटरनेटशीच फोन कनेक्ट होतो. या इंटरनेटद्वारे उत्तर कोरिया सरकारला जी आणि जेवढी माहिती दाखवायची आहे, तीच युजर्सला पुरविली जाते. जर स्मार्टफोनशी छेडछाड झाली किंवा जर बाहेरच्या देशातील माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा मानला जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे.