
विरार लेडीज स्पेशलमध्ये रक्तरंजीत घमासान झाल्याच्या घटनेस पाच दिवस उलटल्यानंतर रेल्वे पोलिसांना जाग आली आहे. 33 वर्षीय महिलेवर हल्ला करणाऱ्या ज्योती सिंग यांच्याविरोधात आज वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. गर्दीमध्ये केवळ धक्का लागला म्हणून दोन लाडक्या बहिणींमध्ये बुक्काबुक्की झाली होती.
चर्चगेट-विरार लेडीज स्पेशलमध्ये 17 जून रोजी प्रवास करणाऱ्या कविता मेंदाडकर आणि ज्योती सिंग या दोघींमध्ये अक्षरशः रक्तरंजीत घमासान झाले. एका महिलेने दुसरीच्या डोक्यात मोबाईलचे घाव घातले. या हल्ल्यात कविता मेंदाडकर यांचे डोके फुटून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना धावत्या लोकलमधूनही फेकण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. आज अखेर मेंदाडकर व सिंग या दोघींना रेल्वे मुख्यालयात बोलावून त्यांचे जबाब घेतले. तसेच ज्योती सिंगविरोधात गुन्हादेखील दाखल केला आहे.
‘त्या’ आरोपाची चौकशी
रक्तबंबाळ होऊनही हल्ल्याची गंभीर दखल घेण्यात आली नाही. तसेच गुन्हादेखील दाखल न करता पाच हजार रुपये घेऊन पोलिसांनी तडजोड केली, असा आरोप कविता यांनी केला होता. या आरोपाची चौकशी करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेचे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी घेतला आहे.