‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर भीषण आग, गोरेगावच्या फिल्मसिटीमधील घटना

छोटय़ा पडद्यावरील ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीमुळे मालिकेचा सेट जळून पूर्णपणे खाक झाला आहे. सुदैवाने, या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.

‘अनुपमा’ या मालिकेचे चित्रीकरण सकाळी 7 वाजता सुरू होणार होते आणि त्याची सेटवर तयारी सुरू होती. आग लागली तेव्हा सेटवर अनेक क्रू मेंबर्स उपस्थित होते. अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. या घटनेनंतर मालिकेचे शूटिंग काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. आगीमुळे शेजारी असलेल्या इतर काही टीव्ही शोच्या सेटचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. निर्माते व प्रॉडक्शन हाऊस पैसे वाचवण्यासाठी अग्निसुरक्षा नियमांचे पालन करीत नसल्याने आग लागल्याचा आरोप त्यांनी केला.