
एक्स्प्रेसने प्रवास करताना झोपी गेलेल्या महिलांच्या उशाखालील पर्स चोरून पसार होणाऱ्या एका रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराला रेल्वे गुन्हे शाखेने पकडले. गुन्हा झाल्यापासून 12 तासात पकडून पोलिसांनी त्याच्याकडून 35 लाखांचा ऐवज हस्तगत केला.
19 जून रोजी एक वृद्धा इंदौर-दौंड एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. उशाखाली आपली पर्स ठेवून त्या झोपी गेल्या. 20 जूनच्या सकाळी एक्सप्रेस कल्याण स्थानकात आली असता पर्स चोरीला गेल्याचे वृद्धेच्या लक्षात आले. त्या पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोकड असा मिळून 35 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी वृद्धेने तक्रार दिल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर आयुक्त कलासागर, उपायुक्त मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक खेडकर, निरीक्षक रोहित सावंत, उपनिरीक्षक सुधाकर सावंत व पथकाने तत्काळ तपास सुरू केला.
चिपळूणमध्ये आरोपी सापडला
पथकाने कल्याण स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्हेगार महेश घाग ऊर्फ विक्की असल्याचे स्पष्ट झाले. मग खबऱ्यांमार्फत विक्कीचा माग काढला असता तो चिपळूणमध्ये असल्याचे समोर आले.





























































