मुंब्रा येथील अपघाताचे खापर प्रवाशावर, रेल्वे अधिकाऱ्यांच्या समितीचा धक्कादायक अहवाल

मुंब्रा स्थानकाजवळ 13 प्रवासी लोकलमधून पडून झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे चौकशी समितीने अपघाताचे खापर एका प्रवाशावर फोडले आहे. हात बाहेर काढून लटकणाऱ्या एका प्रवाशाचा तोल गेल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे.

कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत या दोन गाडय़ांतील प्रवासी रुळावरून पडून 9 जून रोजी भयंकर अपघात झाला होता. दोन लोकल एकमेकांना घासल्याने हा अपघात झाल्याची चर्चा होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये लोकल दिसत असल्या तरी नेमक्या घटनेचे काहीही दृश्य दिसत नसल्यामुळे अपघाताचे नेमके कारण समजणे कठीण झाले होते. मात्र, या अपघातानंतर रेल्वेच्या बेफिकीर कारभारावर टीका होऊ लागल्याने या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक तपासातून काही माहिती समोर आली आहे. त्यानुसार, अपघात झाला तेव्हा दरवाजावर उभ्या असलेल्या दोन्ही लोकल ट्रेनमधील प्रवाशांमध्ये अवघे 0.75 मीटरचे अंतर होते. कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकलमध्ये एक प्रवासी दरवाजावर उभा होता. त्याच्या खांद्यावर बॅग होती. अशा स्थितीत त्याने हात बाहेर काढला. गर्दीमुळे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. पडताना त्याने इतर प्रवाशांना पकडण्याचा प्रयत्न केला असावा. दोन्ही लोकल कुठेही एकमेकांना घासल्या नाहीत, असेही यात स्पष्ट केले आहे.

अहवालानुसार, दोन्ही लोकल ताशी 75 किमी वेगाने धावत असल्याचे समोर आलं आहे की, कसाऱ्यावरून येणाऱ्या लोकलमध्ये एका प्रवाशाने दरवाज्याजवळ उभे राहताना बाहेर हात काढला होता आणि त्याच्या खांद्यावर बॅगही होती. त्याच प्रवाशाचा तोल गेल्याने तो खाली पडला. आणि कदाचित याच प्रवाशाचा हात आणि बॅग इतर प्रवाश्यांना लागल्याने एका मागे एक इतर प्रवासी देखील पडले असावेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पोलिसांची रेल्वेच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठांना नोटीस

मुंब्रा येथील लोकल अपघाताला महिना होत आला तरी त्या अपघातामागचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. रेल्वे पोलिसांच्या तपास पथकाला रेल्वेच्या संबंधित विभागाचे अधिकारी सहकार्य करत नसल्याने चौकशी पुढेच सरकत नसल्याचे चित्र आहे. नोटीस व दोनदा  स्मरणपत्र बजावूनदेखील अधिकारी चौकशीसाठी येत नसल्याने रेल्वे पोलिसांनी आता त्यांच्या वरिष्ठांना नोटीस बजावली आहे.