तेलंगणात केमिकल कंपनीत स्फोट, 12 ठार, 34 जखमी

तेलंगणच्या संगारेड्डी जिह्यात एका केमिकल कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत 12 मजुरांचा मृत्यू झाला असून 34 जण गंभीर जखमी झाले आहेत. कारखान्यात अनेक मजूर अडकून पडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. सिगाची फार्मा असे स्फोट झालेल्या कंपनीचे नाव आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की, त्या दणक्याने काही मजूर 100 मीटर लांब फेकले गेले, तर कारखान्याच्या छताच्या अक्षरशः चिंधडय़ा उडाल्या असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या स्फोटात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर तिघांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोट झाला तेव्हा कंपनीत सुमारे 90 कामगार काम करत होते. हे सर्व मजूर ओडिशा, उत्तर प्रदेश व अन्य राज्यातील आहेत अशी माहिती तेलंगणाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.