होर्डिंग दिसण्यासाठी झाडाला विष टोचून मारले, लता मंगेशकर नाट्यगृहाजवळील वृक्षाने घेतला अखेरचा श्वास

‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ अशी शिकवण संतांनी दिली असली तरी भाईंदरमध्ये झाडांची हत्या करणारे महाभाग आढळून आले आहेत. जाहिरातीचे होर्डिंग्ज दिसावे म्हणून त्याच्या आड येणाऱ्या दोन वृक्षांना विषारी इंजेक्शन टोचून त्यांना मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या इंजेक्शनमुळे भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाजवळील वृक्षाने अखेरचा श्वास घेतला आहे. झाडांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रहाची मागणी पर्यावरणप्रेमींनी मीरा-भाईंदर महापालिकेकडे केली आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाजवळ ‘मेसर्स एंगेज आऊटडोअर मीडिया’ या कंपनीने मोठे जाहिरात फलक लावले आहेत. हे फलक झाडांमुळे झाकले जात होते. आंबा तसेच पेल्टोफोरम असे दोन बहरलेले मोठे वृक्ष महामार्गाची शोभा वाढवत होते. पण जाहिरात फलकाच्या आड हे वृक्ष येत असल्याने निष्ठूर लोकांनी या झाडांच्या बुंध्यापाशी थेट विषप्रयोग केला. तेथे इंजेक्शन मारण्यात आले. थोड्याच दिवसांनी स्थानिकांना ही झाडे कोमेजत असल्याचे दिसून आले.

पालिकेने बजावली नोटीस

पर्यावरणप्रेमी तसेच वृक्षप्रेमींनी झाडांची तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार दिसून आला. यासंदर्भात महापालिका व वनविभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी झाडांची तपासणी केली असता विषारी इंजेक्शन टोचल्याचे आढळून आले. केवळ जाहिरातीचे फलक दिसावेत म्हणून बहरलेल्या वृक्षांचा बळी घेणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने संबंधित जाहिरात एजन्सीला नोटीस बजावली असून त्यांच्याकडून खुलासा मागवला आहे.