
पोलीस म्हटले की अनेकांच्या डोळय़ांसमोर चित्र उभे राहते ती पोटाची ढेरी वाढलेला खाकी वर्दीतील माणूस. मात्र त्यास काही पोलीस तसेच अधिकारी अपवादही ठरले आहेत. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये नेहमीच पोलिसांची छाती अभिमानाने फुगवणाऱया नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी याने अमेरिकेत झालेल्या ‘वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स 2025’ या स्पर्धेतही आपले पीळदार स्नायू दाखवत दुहेरी सुवर्ण पदकाचा धमाका केला. त्यांनी शरीरसौष्ठवासह फिजिक या प्रकारातही सोनेरी यश संपादत अमेरिकेत हिंदुस्थानचा झेंडा फडकवला आहे.
अमेरिकेच्या बार्ंमगहॅम, अलाबामा येथे सुरू असलेल्या जागतिक पोलीस स्पर्धेत जगभरातील 76 देशांतील खेळाडूंनी विविध खेळांत आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी याने शरीरसौष्ठवाच्या 172 सेमी उंची गटात आणि मेन्स फिजिक प्रकारात अव्वल स्थान पटकावले. आजवर सुभाष पुजारीने 10 आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई केली असून, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे हे फलित असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, ठाण्याचे सहपोलीस आयुक्त श्रीकांत पाठक या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱयांनी सुभाष पुजारी याला प्रोत्साहित करून या स्पर्धेसाठी मोलाची मदत केली. पुजारीच्या जबरदस्त कामगिरीमुळे नवी मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील पोलीस दलातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुजारीची पीळदार आंतरराष्ट्रीय कामगिरी
2021 सुवर्ण पदक मि. इंडिया (लुधियाणा)
2021 कांस्य पदक मि.वर्ल्ड (उजबेकिस्तान)
2022 सुवर्ण पदक मि. इंडिया (पॉण्डिचेरी)
2022 कांस्य पदक मि. वर्ल्ड (थायलंड)
2023 रौप्य पदक पोलीस गेम्स (पॅनडा)
2023 कांस्य पदक पोलीस गेम्स (पॅनडा)
2023 कांस्य पदक मि. एशिया (काठमांडू)
2023 कांस्य पदक मि. एशिया (काठमांडू)
2023 सुवर्ण पदक मि. वर्ल्ड (द. कोरिया)
2024 रौप्य पदक मि. एशिया (इंडोनेशिया)
2024 रौप्य पदक मि. वर्ल्ड (मालदीव्ज)
2025 सुवर्ण पदक पोलीस गेम्स (अलबामा)
2025 सुवर्ण पदक पोलीस गेम्स (अलबामा)
(2023 आणि 2025च्या पोलीस गेम्समध्ये,तसेच 2023 च्या मि. एशियात दोन गटात पदक विजेती कामगिरी)