चाललंय काय… हजारो फुटांवर विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली, गोवा-पुणे फ्लाईटमधील प्रवाशांना धडकी

गेल्या महिन्यात अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई विमानतळा जवळ एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर विमानांच्या वाहतुकीत येणाऱ्या व्यत्ययाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कधी विमानांना वादळी वाऱ्यासह पावसाचा सामना करावा लागला, तर कधी धावपट्टीवर उतरताना काहीतरी गडबड झाली. यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच गोव्याहून पुण्याकडे येणाऱ्या विमानातही असाच एक प्रकार घडला आहे. विमान हजारो फुटांवर असताना खिडकीची फ्रेम निखळली आणि प्रवाशांची भीतीने तारांबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. हे विमान गोव्याहून पुण्याच्या दिशेने सायंकाळी 5.20 वाजता उड्डाण घेणार होते. मात्र तब्बल दीड तास उशिराने 6.55 मिनिटांनी हे विमान पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले.

उड्डाणानंतर अर्थ्या तासाने विमानात एक धक्कादायक घटना घडली. हवेत हजारो फुटांवर असताना विमानाच्या एका खिडकीची फ्रेम निखळली. या खिडकीजवळ एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन बसली होती. अचानक फ्रेम निखळल्याने महिला प्रचंड घाबरली. तिने याची तक्रार विमानातील क्रूकडे केली. अखेर केबिन क्रूने त्या महिलेला वेगळ्या सीटवर बसवले. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून विमान कंपन्यांच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

स्पाइसजेटचे स्पष्टीकरण…

दरम्यान, स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने याबाबत खुलासा केला आहे. ‘स्पाइसजेटच्या क्यू-400 विमानातील एक कॉस्मेटिक विंडोफ्रेम उड्डाणादरम्यान सैल झाल्यामुळे निखळली. हा एक नॉनस्ट्रक्चरल ट्रिम घटक होता. जो सावलीसाठी खिडकीवर बसविण्यात आला होता. या घटनेमुळे विमानाची कोणतीही सुरक्षितता धोक्यात आली नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झाला नाही’, असे स्पाइसजेटने म्हटले आहे.